Home ताज्या बातम्या दीपावलीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरावर आकर्षक शुभकलशाची सजावट

दीपावलीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरावर आकर्षक शुभकलशाची सजावट

0

दीपावलीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरावर आकर्षक शुभकलशाची सजावट
पुणे : आंब्याची पाने, तांब्याचा गडवा आणि नारळाच्या सजावटीने साकारलेला शुभकलश, रंगीबेरंगी दिवे, आकर्षक झुंबरे आणि विविधरंगी फुलांनी सजलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात लाडके गणपती बाप्पा विराजमान झाले. दीपावलीनिमित्त केलेली ही शुभकलशाची सजावट आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासोबतच हे नयनरम्य दृश्य डोळय़ात साठविण्याकरीता भाविकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली. दिवाळीनिमित्त मंदिराचा परिसर आकाशकंदिल, पणत्या आणि रांगोळीच्या पायघडयांनी सजविण्यात आला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 127 व्या वर्षानिमित्त दरवषीप्रमाणे यंदाही दीपावलीनिमित्त मंदिरावर आकर्षक सजावट करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांसह विश्वस्त आणि कारागिरांच्या संकल्पनेतून ही सजावट साकारण्यात आली. सलग 15 दिवस 30 कारागिर याकरीता काम करीत होते. जरी वर्कचे कापड, व्हेलवेटचे कापड आणि 150 झुंबरांचा वापर सजावटीमध्ये करण्यात आला आहे.

अशोक गोडसे म्हणाले, अंधःकारवर मात करुन ज्ञानरुपी प्रकाशाकडे नेणारा हा दीपोत्सव आहे. त्यामुळे गणपती बाप्पाच्या कृपेने सगळय़ांच्या जीवनात आनंदरुपी प्रकाश येऊ देत. दरवषीप्रमाणे यंदाही दिवापलीनिमित्त मंदिरावर झुंबरे, आकाशकंदील, पणत्या लावण्यात आल्या. यांसह मंगलआरती, पाद्यपूजन व बँडच्या निनादाने मंदिराचा परिसर देखील दुमदुमून गेला. भाविकांनी ही सजावट पाहण्याकरीता उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.