Home बातम्या दुरुस्तीसाठी बंद केलेली मुंबई ते पुणे रेल्वे शनिवारी रुळावर येण्याची शक्यता

दुरुस्तीसाठी बंद केलेली मुंबई ते पुणे रेल्वे शनिवारी रुळावर येण्याची शक्यता

0

मुंबई : मुंबई ते पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना वाढल्यामुळे २६ ते ९ ऑगस्टदरम्यान अनेक मेल, एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. या कालावधीत मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याने १० ऑगस्टपासून ही वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.

घाट भागात लोखंडी जाळ्या बसविण्याचे, मंकी हिल घाटात दरड हटविण्याचे काम जोरात सुरू आहे. क्रेनच्या साहाय्याने मातीचा ढिगारा हटविण्यात येत असून रेल्वे रुळाची दुरुस्ती केली जात असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. रेल्वेला ६० ते ७० कोटींचा फटका
मुसळधार पावसामुळे नेरळ ते शेलूदरम्यान रेल्वे रुळांखालील खडी वाहून गेली आहे. शिवाय अनेक ठिकाणी रूळ नादुरुस्त झाले.
सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड निर्माण झाला; तसेच अनेक ठिकाणी ओव्हरहेड वायरचे खांब झुकले गेले आहेत.
या सर्व दुरुस्तीकामासाठी रेल्वेला अंदाजे ६० ते ७० कोटी रुपयांचा खर्च करावा लागल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
शिवाय मुसळधार पडलेल्या पावसामुळे ५७ मेल, एक्स्प्रेस रद्द केल्या. १०० पेक्षा मेल, एक्स्प्रेसच्या मार्गांत बदल केला. यामुळे लांब पल्ल्यांच्या प्रवाशांना तिकीट परतावा करण्यासाठी सुमारे १० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.