Home शहरे अकोला दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी शिबिराचे आयोजन – पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी

दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी शिबिराचे आयोजन – पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी

0
दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी शिबिराचे आयोजन – पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी

नंदुरबार, दि.17 (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या तोरणमाळ व परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा मिळाव्यात, याकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी केले.

तोरणमाळ येथे आयोजित आरोग्य शिबीर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, खासदार डॉ. हिना गावित, जि.प.समाजकल्याण सभापती रतन पाडवी, कृषी व पशुसंवर्धन सभापती गणेशदादा पराडके, जि. प. सदस्य सुहास नाईक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.वि) के.एफ.राठोड, तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, डॉ.राजेश वसावे, गट विकास अधिकारी सी.टी.गोस्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश वळवी, सामाजिक कार्यकर्ते जीवनदादा रावताळे, सरपंच मधुकर चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी अॅड.पाडवी म्हणाले, दुर्गम भागातील नागरिकांना विविध आजाराच्या उपचारासाठी शहराच्या ठिकाणी जावे लागू  नयेत. त्यांना स्थानिक पातळीवरच उपचाराची सोय व्हावी, याकरिता शासनामार्फत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची विविध आजाराची तपासणी करुन त्यांना काही आजार असल्यास त्यांच्यावर तेथेच औषधोपचार करण्यात येतील. तर गंभीर आजार असणाऱ्या रूग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात येणार असल्यामुळे या शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड. पाडवी यांनी यावेळी केले.

नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांचे विविध आजाराचे योग्य निदान होऊन त्वरीत उपचारासाठी 15 कोटी रुपंयाचे एमआरआय मशिन जिल्ह्यासाठी घेण्यात येणार असून त्याचा जिल्ह्यातील नागरिकांना लाभ होणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागू नये याकरिता आता जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली असून या महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त निधी आरोग्य विभागाला देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सिकलसेल निर्मुलनासाठी 2 कोटीची तरतूद केली आहे. तर तोरणमाळ येथे 33 के.व्ही उपकेंद्र मंजूर करण्यात आले असून जिल्हा वार्षिक योजनेतून 7 कोटी 13 लक्षचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

ॲड. सीमा वळवी म्हणाल्या, तोरणमाळच्या दुर्गम भागातून आरोग्य शिबीराची सुरुवात होत असल्याने मला अत्यंत आनंद होत असून या शिबीरात तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत आरोग्यांची तपासणी होणार असल्याने येथील नागरिकांनी यासेवेचा लाभ घ्यावा. कुपोषण व सिकलसेल व इतर आजाराचे निर्मुलन करण्यासाठी आरोग्य विभागाने दर महिन्याला वेगवेगळ्या ठिकाणी असे शिबीर घ्यावे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. लसीकरणाबाबत काही गैरसमज असल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे. लस ही सुरक्षीत असून अद्यापही  ज्या नागरिकांनी कोरोना लसीकरण करून घेतले नाही त्यांनी लसीकरण करण्याचे आवाहनही श्रीमती वळवी यांनी यावेळी केले.

खासदार डॉ. गावित म्हणाल्या, दरवर्षी राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत सर्व रोगनिदान शिबीराचे आयेाजन करण्यात येते. या शिबीरात वेगवेगळया विभागाचे तज्ञ डॉक्टर हे एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने महिलांना व नागरिकांना कुठलेही आजार असतील तर त्यांनी या शिबीरात येवून तपासणी करुन घ्यावी. वेळेत तपासणी केली तर मोठ्या आजारापासून लवकर निदान करता येत असल्याने या शिबीराचा येथील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. गर्भवती मातांनी दवाखान्यात नोंदणी करावी, आशा सेविकांनी देखील वेळोवेळी गर्भवती माताची नाव नोंदणी व तपासणी करावी. गर्भवती माताची तपासणी, प्रसुती व इतर उपचारासाठी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा. आदिवासी समाजात सिकलसेलचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांनी लग्नाआधी सिकलसेलची तपासणी करावी असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात डॉ. राजेश वसावे यांनी शिबीराची माहिती दिली. या शिबीरात  तोरणमाळ, झापी, खडकी फलई, सिंधीदिगर येथील नागरिक सहभागी झाले होते.

पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते रामपूर येथील मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन संपन्न

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार अंतर्गत शहादा तालुक्यातील रामपूर शासकीय आश्रमशाळा येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, जि.प.समाज कल्याण सभापती रतन पाडवी, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, जि. प.सदस्य सुहास नाईक, हेमलता शितोळे, प्रताप वसावे, मकराजी आरीफ, पंचायत समिती उपसभापती वैशाली पाटील, प्रकल्पस्तरीय समिती अध्यक्ष दिलीप नाईक आदी उपस्थित होते.

अॅड.पाडवी म्हणाले, आदिवासी भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर शासनाचा भर असून त्यासाठी अध्यापन पद्धतीत बदल करीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सहाय्य करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सुविधांचा लाभ घेऊन उच्च शिक्षित व्हावे आणि गावाचा विकास घडवून आणावा. आदिवासी मुलांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी जयपालसिंह मुंडा यांच्या नावाने आदिवासी विभागाचे स्वंतत्र क्रीडा धोरण ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी कायमची पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत प्रस्ताव सादर करावे. आदिवासी विकास विभागातील शिक्षक व रोजंदारी कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडविण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

ॲड. सीमा वळवी म्हणाल्या, नवीन वसतिगृह इमारतीमुळे विद्यार्थींनीसाठी चांगली सुविधा निर्माण होणार आहे. शिक्षण व खेळामध्ये विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण द्यावे. असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार पाडवी म्हणाले की, जिल्ह्यात आदिवासी विभागाच्या आश्रमशाळाच्या इमारती खुप चांगल्या असून याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. रामपूर येथे उभारण्यात येणाऱ्या या नूतन वसतिगृहाच्या इमारतीमुळे 200 विद्यार्थींनीना याचा लाभ मिळणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

या नूतन वसतिगृहाच्या  इमारत बांधकामासाठी  आदिवासी विभागामार्फत 5 कोटी 23 लक्ष इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे या इमारतीत तळमजल्यात अधीक्षक निवासस्थान, भोजन कक्ष,  तर पहिला मजल्यावर 11 खोल्या, दुसरा मजल्यावर 11 खोल्या उभारण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  संदीप झाल्टे यांनी तर सुत्रसंचलन सहायक प्रकल्प अधिकारी एन.आर.माळी यांनी केले. कार्यक्रमाला सहायक प्रकल्प अधिकारी संजय काकडे, संजय चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी डी.जी.बागुल, आर.जे.मुसळे, व्ही.व्ही.सोनार, एस.एस.पाटील, डी.एच.माळी, एस.आर.पाटील, आर.एन.निकम, मुख्याध्यापक पी.एस.कुंभार, अधीक्षीका किरण घुले, सरपंच नर्मदा पावरा, परिसरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि नागरीक उपस्थित होते.

0000