दुर्धर आजारावरील उपचारांचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत करावा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १८: राज्यातील दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना वेळेत निदान आणि प्रभावी उपचार मिळावेत, तसेच महागड्या उपचारांचा आर्थिक भार रुग्णांच्या कुटुंबीयांवर पडू नये, यासाठी अशा आजारांचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य विभागाला दिले.

    स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (एसएमए) या दुर्धर आजाराच्या रुग्णांना उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सर्वंकष कार्यपद्धती (एसओपी) तयार करावी, तसेच या आजाराचे लवकर निदान, रुग्ण नोंदणी आणि उपचारांची प्रक्रिया अधिक प्रभावी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    विधानभवनातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात राज्यातील दुर्धर आजारांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य आयुक्त संजय काटकर, वाडिया रुग्णालयाचे बालरोग तज्ञ डॉ. अनीष ऐनापुरे, केईएम रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या सह अध्यापिका डॉ. प्रग्या जोशी, जिजा सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.

    या वेळी महाराष्ट्रातील एसएमए आजाराच्या रुग्णांची सद्यस्थिती, आजाराचे निदान, उपलब्ध उपचारपद्धती, औषधांची उपलब्धता आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

    महाराष्ट्रासाठी केंद्र शासनाने मुंबईतील केईएम रुग्णालयाची ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून निवड केली आहे. या केंद्रामार्फत दुर्धर आजारांचे निदान, रुग्णांची नोंदणी आणि उपचारविषयक कार्यवाही केली जाते. मात्र, या आजाराच्या रुग्णांना उपचार अधिक सुलभतेने आणि वेळेत उपलब्ध होण्यासाठी निश्चित कार्यपद्धती असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने एसएमए रुग्णांच्या उपचारांसाठी, लवकर निदानासाठी तसेच तोंडावाटे घेण्यात येणाऱ्या औषधांच्या उपलब्धतेसंदर्भात स्वतंत्र एसओपी तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

    मुंबईतील वाडिया बालरुग्णालयातही एसएमए आजारावरील उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे या रुग्णालयालाही ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा मिळावा, यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडे पाठवावा, असे निर्देश शिंदे यांनी दिले. यासंदर्भात आपण स्वतः केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवून पाठपुरावा करू, असेही त्यांनी सांगितले.

    एसएमए सारख्या दुर्धर आजारांवरील उपचार अत्यंत खर्चिक असल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आर्थिक कारणांमुळे कोणत्याही रुग्णाचे उपचार थांबू नयेत, यासाठी या आजाराचा महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच केईएम रुग्णालयाने या दुर्धर आजारावरील आवश्यक औषधांचा जीवनावश्यक औषधांच्या यादीत समावेश करून त्यांची खरेदी करावी. त्यामुळे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना औषधे वेळेत आणि सुलभतेने उपलब्ध होतील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

    दुर्धर आजारांचे लवकर निदान, उपचारांची उपलब्धता, औषधांचा पुरवठा आणि रुग्णांना आर्थिक संरक्षण या सर्व बाबींचा समन्वय साधून राज्यातील एसएमए रुग्णांना दिलासा देण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिले.
    ००००

    - Advertisement -