दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची दिवाळी; एकाच ताटात फराळाचा आस्वाद घेत जपली आपुलकीची नाती – महासंवाद

    - Advertisement -

    जळगाव, दि. ८ : दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असून, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा भावनिक संदेश देत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यंदाची दिवाळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत साजरी केली.

    जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील बंजारा समाजबहुल पोखरी तांडा येथे ग्रामस्थांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. यावेळी ग्रामस्थांसोबत एकाच ताटात दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेत त्यांनी आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ केले.

    दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी बांधवांना सणाच्या आनंदात सहभागी करून घेण्यासाठी तसेच शासन त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास देण्यासाठी राज्यातील मंत्र्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोखरी तांडा येथे ग्रामस्थांसोबत दीपोत्सव साजरा केला.

    पारंपरिक स्वागताने फुलला दिवाळीचा आनंद

    पोखरी तांडा येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आगमन होताच गावातील महिलांनी औक्षण करून पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी महिलांनी पारंपरिक गीते सादर करीत दिवाळीच्या उत्साहात भर घातली. ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभाग घेतला. मंत्री आणि ग्रामस्थ यांच्यातील हा स्नेहमेळावा दिवाळीच्या आनंदासोबतच सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीचा प्रत्यय देणारा ठरला.

    000

    - Advertisement -