गेल्या काही दिवसांपासून राज्याला केंद्राकडून लशीचा पुरवठा झाला नव्हता. त्यामुळे पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण थांबले होते. पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने त्यांनाही दुसरा डोस कधी मिळणार, याची प्रतीक्षा होती. अखेर मंगळवारी लशींचा साठा उपलब्ध झाल्याने लसीकरणाचा मार्ग तूर्तास मोकळा झाला आहे. ‘राज्यात ४५ वर्षांपुढील अनेक नागरिक दुसऱ्या डोसची वाट पाहात आहेत. त्या करिता केंद्राकडे लशींची मागणी नोंदविण्यात आली आहे. मागणीच्या तुलनेत केंद्र सरकारकडून पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरणात अडचणी येत आहेत,’ अशी कबुली राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिली आहे.
‘कोव्हॅक्सिन’चा पावणेपाच लाखांचा साठा
राज्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी एक मेपासून लसीकरण सुरू झाले आहे. त्यांच्यासाठी चार लाख ७९ हजार १५० एवढ्या कोव्हॅक्सिन लशींचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू राहणार आहे. पुणे शहरात १० हजार, पिंपरी चिंचवडला सात हजार, तर ग्रामीण भागात १५ हजार ‘कोव्हॅक्सिन’ लशी पुरविण्यात आल्याची माहिती सहायक संचालक डॉ. संजय देशमुख यांनी दिली.
विभाग कोव्हिशील्ड लशींचा पुरवठा
पुणे ……………. ४०,०००
पिंपरी चिंचवड………..२०,०००
पुणे ग्रामीण …………..१३,८००
मुंबई ………… १,००,०००
नागपूर…………४५,५००
ठाणे …………….. ३८, ४००
कोल्हापूर ………..३२,४००
औरंगाबाद…………१९,५००
सातारा…………..१४,७००
सोलापूर …………..५७,०००
केंद्र सरकारने नऊ लाख कोव्हिशील्ड लशींचा पुरवठा केला असून लसीकरण केंद्रांवर दुसऱ्या डोससाठी येणाऱ्या नागरिकांना प्राधान्य दिले जावे. आत्ता उपलब्ध झालेल्या साठ्यातून पुढील तीन ते चार दिवस लसीकरण होईल. आणखी लशींची प्रतीक्षा आहे.
डॉ. दिलीप पाटील, लसीकरण अधिकारी आणि सहसंचालक