Home ताज्या बातम्या ‘दूध अन् अन्नभेसळीचा ‘फैसला ऑन दी स्पॉट’, मोबाईल फूड टेस्टींग लॅब लाँच

‘दूध अन् अन्नभेसळीचा ‘फैसला ऑन दी स्पॉट’, मोबाईल फूड टेस्टींग लॅब लाँच

मुंबई : राज्यातील पहिल्या फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यात लवकरच अजून एक मोबाइल फूड टेस्टिंग लॅब दाखल होणार आहे. मुंबईसाठी स्वतंत्र मोबाइल फूड टेस्टिंग लॅब (फिरती अन्न तपासणी प्रयोगशाळा) असेल, अशी माहिती रावल यांनी यावेळी दिली. राज्यात आता विविध अन्न पदार्थांची मोबाइल फूड टेस्टिंग लॅबमार्फत (फिरती अन्न तपासणी प्रयोगशाळा) तपासणी होणार आहे.

दूध आणि अन्न भेसळ रोखण्यासाठी तसेच लोकांना शुद्ध आणि आरोग्यदायी, पोषक आहार मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज ही फिरती अन्नपदार्थ तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात येत असल्याचे मंत्री रावल यांनी म्हटले. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून दुधाची तपासणी, साखर तसेच चहा पावडरमध्ये केल्या जाणार्या भेसळीची तपासणी, भेसळ केल्या जाणार्या रंगांची तपासणी करण्यास मदत होणार आहे. चटणी व मसाले पदार्थात होणाऱ्या रंगाच्या भेसळीची तपासणीही करता येईल. अगोदर विविध प्रकारच्या तपासण्या फिल्डवर जाऊन करता येणार आहेत. या प्रयोगशाळेत अन्नपदार्थ तपासणीचा अहवाल लगेच मिळणार असल्याने भेसळ प्रकरणी तातडीने कार्यवाही करता येणार आहे. पूर्वी भेसळ प्रकरणी कार्यवाही झाल्यास, तपासणीचा अहवाल येण्यास किमान सात दिवस लागत असत. आता फिरत्या प्रयोगशाळेत भेसळ तपासणीचा अहवाल अर्ध्या तासातच मिळणार असल्याने त्यावर कार्यवाही करणे तसेच भेसळ रोखणे सुलभ होणार आहे, अशी माहितीही रावल यांनी दिली.

या फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळेत एक अन्न सुरक्षा अधिकारी, एक विश्लेषक आणि परिचर यांची टीम कार्यरत असणार आहे. ही मोबाइल व्हॅन गर्दीच्या व खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी जाऊन लोकांमध्ये अन्न सुरक्षा व अन्न भेसळीबाबत जागरूकता करणार आहे. तसेच अन्नाची प्राथमिक तपासणी करेल. या मोबाईल टेस्टिंग व्हॅनमध्ये दैनंदिन जीवनातील अन्न पदार्थ तसेच दूध, तूप, तेल, चहा पावडर, मसाले इ. यातील भेसळकारी पदार्थ ओळखणे शक्य होईल. या मोबाइल टेस्टिंग व्हॅनमध्ये अन्न सुरक्षेविषयी नियम व स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणारी माहिती देण्यात येणार आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मोबाईल फूड टेस्टींग लॅबचे उद्घाटन करण्यात आले.

फिरत्या प्रयोगशाळेत होतील खालीलप्रमाणे

दुधातील भेसळ 
चहा पावडरमध्ये होणारी रंगांची भेसळ
चटणी सदृश्य मसाले पदार्थात होणारी रंगांची भेसळ 
मधात होणारी भेसळ 
साखरेत होणारी भेसळ 
अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासणी
फळांची गुणवत्ता तपासणी
फळांचे रासायनिकीकरण ओळखणे आदी

दरम्यान, अन्न भेसळ रोखण्यासाठी काही तक्रार असल्यास नागरीकांनी १८००२२२३६५ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी अन्न औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आले.