हायलाइट्स:
- देवमाणूस मालिकेत आता नवीन एंट्री
- देवीसिंगच्या अडचणीमध्ये अॅड. आर्याच्या रुपाने वाढ
- एसीपी दिव्या आणि अॅड. आर्या देवीसिंगचा बुरखा फाडणार का?
एसीपी दिव्याने देवीसिंगला भर लग्नाच्या मांडवातून उचलून त्याची वरात थेट पोलिस स्टेशनला काढली आहे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठी दिव्याने जीव तोडून मेहनत घेतली आहे. परंतु देवीसिंगने देखील एसीपी दिव्याचा डाव उलटवण्याचा निर्धार केला आहे. त्याला कोर्टात सादर केले असून तो स्वतःची बाजू स्वतःच मांडत आहे. मेहनत घेत गोळा केलेले पुरावे दिव्या लवकरच कोर्टासमोर सादर करणार आहे. या कामामध्ये तिला साथ देण्यासाठी आणि देवीसिंगचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी सरकारी वकील म्हणून आर्या देशमुखची एंट्री मलिकेत झाली आहे. अॅडव्होकेट आर्या आणि एसीपी दिव्या दोघींनी मिळून देवीसिंगला खडी फोडायला पाठवण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी कोर्टात त्याच्यासोबत वादविवाद करताना आर्या दिसणार आहे.
अॅड. आर्याची भूमिका अभिनेत्री सोनाली पाटील ही साकारत आहे. इतकेच नाही तर सोनाली पाटीलने सोशल मीडियावरही काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. तिनं कॅप्शनमध्ये म्हटले आहे , ‘मी येतेय पुन्हा एका नव्या रूपात…’ आता ही सरकारी वकील देवी सिंगला शिक्षा करून देण्यात यशस्वी होईल कि ती देखील देवी सिंगची शिकार होईल या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी झी मराठीवरून १०.३० वाजता प्रसारित होणारी देवमाणूस मालिका नक्की बघा.