Home ताज्या बातम्या देव पावला! ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया आजपासून

देव पावला! ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया आजपासून

पुणे – बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षण हक्‍क कायद्याअंतर्गतच्या (आरटीई) 25 टक्के प्रवेश प्रक्रियेस बुधवारपासून सुरुवात होणार आहे. प्रवेशाची लॉटरी लागलेल्या मुलांच्या पालकांनी शाळांनी कळविलेल्या तारखेस शाळांमध्ये जाऊन कागदपत्रांची पडताळणी करुन प्रवेश निश्‍चित करावा लागणार आहे.

‘आरटीई’ प्रवेशासाठी 9 हजार 331 शाळांनी नोंदणी केलेली आहे. प्रवेशासाठी 1 लाख 15 हजार 446 जागा दर्शविण्यात आलेल्या आहेत. प्रवेशासाठी 2 लाख 91 हजार 368 ऑनलाईन अर्ज पालकांकडून नोंदविण्यात आले आहेत. प्रवेशासाठी 1 लाख 926 मुलांना लॉटरी लागली आहे. प्रतीक्षा यादीत 75 हजार 465 मुलांचा समावेश करण्यात आलेला आहे.

करोना प्रादुर्भावामुळे पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची तपासणी करण्या बाबतची प्रक्रियाही रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता जुलैपासून शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. त्यामुळे प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याच्या सर्व शाळांना प्रवेश प्रक्रियेबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

पालकांसाठी सूचना…
शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये. तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना पाल्यास बरोबर नेऊ नये. गेटवर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचनाही शाळांना दिल्या आहेत. प्रवेशासाठी लागणारी आवश्‍यक ती कागदपत्रे सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेशाची तारीख मेसेजद्वारे कळवली जाईल. परंतु पालकांनी फक्‍त मेसेजवर अवलंबून राहू नये. ‘आरटीई’ पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याची तारीख पाहवी लागणार आहे.