Home शहरे अकोला देशाच्या अर्थव्यवस्थेत छोटे उद्योग व्यवसायिकांचे योगदान महत्त्वाचे – केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार – महासंवाद

देशाच्या अर्थव्यवस्थेत छोटे उद्योग व्यवसायिकांचे योगदान महत्त्वाचे – केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार – महासंवाद

0
देशाच्या अर्थव्यवस्थेत छोटे उद्योग व्यवसायिकांचे योगदान महत्त्वाचे – केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार – महासंवाद

नाशिक, दिनांक: 31 जुलै, 2022 (जिमाका वृत्तसेवा) : देशाच्या अर्थ व्यवस्थेत छोटे उद्योग व्यवसायिकांचे योगदान महत्त्वाचे असते. ही बाब विचारात घेऊन या लहान उद्योग व्यवसायांना पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देवून या व्यावसायिकांना आत्मनिर्भर करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. जिल्ह्यात आज या योजनेची यशस्वी अंमलबजावणी होत असून यातूनच सबका साथ आणि सबका विकास होतांना दिसत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले आहे.

जिल्ह्यातील महाकवी कालिदास कलामंदिर येथे  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘पीएम स्वनिधी महोत्सव’, स्वावलंबी पथविक्रेता यांच्या उत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. पवार बोलत होत्या. या कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, आमदार प्रा. देवयानी  फारांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह पथविक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, देशाच्या स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. जर आपल्याला आत्मनिर्भर भारत ही ओळख घेऊन पुढे जायचे असेल तर अशा वेळी शेतकरी, छोटे उद्योग व्यवसाय, बचत गट तसेच तळागाळातील लोकांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे आहे. स्वनिधी योजनेच्या माध्यमातून पथविक्रेत्या लाभार्थ्यांसोबतच त्याच्या कुटुंबाचा सर्वांगिण विकास होण्यासाठी लाभार्थ्यांला इतर आठ योजनांचा देखील लाभ उपलब्ध करून देण्‍याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या अमृत महोत्सवी वर्षात देशातील 75 शहरांची निवड करण्यात आली त्या शहरांमध्ये नाशिक जिल्ह्याचा समावेश असून योजनेतील आपल्या जिल्ह्याने केलेली कामगिरी देशात व राज्यात उल्लेखनीय असणे ही अभिमानाची गोष्ट आहे.

केंद्र सरकारने स्वनिधी योजनेंतर्गत देशपातळीवर साधारण 36 लाख लाभार्थ्यांना 3 हजार 592 कोटी रुपयांची रक्कम कर्जपोटी वितरीत करण्यात आली आहे. तसेच 12 लाख पथविक्रेत्यांनी पहिल्या कर्जाच्या रकमेची परतफेड केली आहे. राज्यात दोन लाख लाभार्थी असून एक लाख पाच हजार कुटुंबांनी या योजनेतून मदत घेतली आहे. कोणतीही योजना यशस्वी करण्यासाठी टीम वर्क आवश्यक असते. प्रगती करण्यासाठी प्रयत्नांची ताकद महत्वाची असते. या विचारातूनच जिल्ह्यात या टीमवर्कच्या मदतीनेच सर्व पदाधिकारी व अधिकारी यांनी पीएम स्वनिधी योजनेची यशस्वी अंमलबजावणी होतांना दिसत आहे. यासाठी सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या योजनेसाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले.

पथविक्रेत्यांनी वाहतूक व स्वच्छतेचे नियम पाळून व्यवसाय करावा – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

केंद्र सरकार व राज्य शासन नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेणाऱ्या पथविक्रेत्यांनी व्यवसाय करतांना वाहतुकीला अडथळा होणार नाही, रस्त्यावर कचरा होणार नाही याची दक्षता घेवून स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून व्यवसाय करावा. तसेच अन्न पदार्थांची व फळांची विक्री करतांना ते ताजे व दर्जेदार असण्यावर भर देण्यात यावा, असे आवाहन यावेळी विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी केले आहे.

कोरोना काळात आपण सर्वांनी मोठ्या संकटाचा सामना केला आहे. या काळात अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. या लोकांना उभारी देण्यासाठी व स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अर्थात पीएम स्वनिधी योजना सुरू करण्यात आली. नाशिक महानगरपालिकेने पीएम स्वनिधी योजनेची जिल्ह्यात यशस्वीपणे अंमलबजावणी केल्यामुळे आज नाशिक महानगरपालिकेचे कार्य देशात व राज्यात उललेखनिय आहे, असेही विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकार व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा – महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

मागील दोन वर्षात कोरोना काळात छोट्या उद्योग व व्यवसायांना मोठ्या प्रमाणवर आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. या उद्योग व्यवसायांना आर्थिक हातभार लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यातील महत्वाच्या योजना म्हणजे पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, प्रधानमंत्री इमारत व इतर बांधकाम या योजनांचा जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.

पीएम स्वनिधी योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी महानगरपालिकेचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. शासनाच्या या योजना आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे सर्वोतपरीने प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री वन नेशन वन राशन कार्ड व प्रधानमंत्री इमारत व इतर बांधकाम या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल, असेही आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी यावेळी सांगितले.

स्वनिधी महोत्सव कार्यक्रमाच्या सुरूवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कालिदास कलामंदिरात करण्यात आले होते. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित सर्व पथविक्रेत्यांनी पंतप्रधान यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमानंतर महिला बचत गटांनी लावलेल्या फुड स्टॉलचे उद्धघाटन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले. स्वनिधी महोत्सव कार्यक्रम प्रसंगी आमदार देवयानी फरांदे यांनी आपल्या मनोगतातून पीएम स्वनिधी योजनेला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम यांनी केले तर उप आयुक्त करूणा डहाळे यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेची सविस्तर माहिती दिली.

यांचा झाला सन्मान

रामेश्वर खंड, सुनंदा भामरे, नामदेव शेंडगे, गिता शिंदे, नंदा पाटील, गोपाळ वरणकर, गोकुळ गरूड या पथविक्रेत्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला. तर बँक ऑॅफ महाराष्ट्राचे राजेश पाटील, एसबीआय बँकेचे गौतम गरूड, युनियन बँकेचे जिल्हा समन्वयक महेश धुणे, सुनिल बारा, बँक ऑफ बडोदाचे जितेंद्र नवलखा, इंडियन ओवरसिस बँकेच्या सरिता देशमुख, बिझनेस बँकेचे वसंत गुरूवाणी या उत्कृष्ट काम करणाऱ्या बँकांचा यांचा सत्कार करण्यात आला. तर शिवगंगा व गजानन महाराज महिला बचत गटास प्रत्येकी रुपये एक लाख, जय मल्हार महिला बचत गटाला रूपये दोन लाख तर सरस्वती महिला बचत गटाला तीन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

0000000