
सिंधुदुर्ग, दि. १८: महाराष्ट्राला अंतराळ क्षेत्रातील उद्योग, संशोधन आणि नवकल्पनांचे जागतिक केंद्र बनविण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, देशातील पहिला ‘स्पेस पार्क’ महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे. तसेच राज्याच्या माध्यमातून पाच बहुउद्देशीय उपग्रह विकसित करून पुढील १८ महिन्यांत त्यांचे प्रक्षेपण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी वेंगुर्ला येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
फ्रान्समधील पॅरिस येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘पॅरिस वर्ल्ड स्पेस बिझनेस वीक’ परिषदेत अंतराळ क्षेत्रातील जागतिक कंपन्यांसोबत महाराष्ट्रातील अंतराळ धोरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या परिषदेत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, त्यातून महाराष्ट्रात अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित उद्योग, संशोधन आणि नवउद्योजकतेला चालना मिळणार आहे. फ्रान्स आणि भारत यांच्यातील औद्योगिक सहकार्याचा वारसा आणखी मजबूत होण्यास या उपक्रमामुळे मदत होईल, असा विश्वासही मंत्री डॉ. सामंत यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अंतराळ क्षेत्रात महाराष्ट्राची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी हे धोरण राबविण्यात येत आहे. उद्योग, संशोधन, तंत्रज्ञान आणि रोजगार या सर्व घटकांना एकत्रितपणे चालना देत महाराष्ट्राला देशाच्या अंतराळ क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.
राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे आणि बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे हा या अंतराळ धोरणामागील प्रमुख उद्देश आहे. शासनाने देशातील पहिली अभिनव ‘स्पेस पॉलिसी’ प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने पावले उचलली असून, जागतिक स्तरावरील अंतराळ कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून भविष्यात अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग उभे राहून हजारो कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल आणि महसूल निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
राज्य शासनाच्या माध्यमातून विकसित करण्यात येणारे पाच बहुउद्देशीय उपग्रह केवळ अंतराळ संशोधनापुरते मर्यादित राहणार नसून, त्यांचा उपयोग मानवी जीवनाशी निगडित विविध क्षेत्रांसाठी केला जाणार आहे. कृषी विकास, पर्यावरण संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन, शहरी नियोजन, आरोग्य सेवा तसेच उद्योग क्षेत्रातील अचूक नियोजनासाठी उपग्रहांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीचा उपयोग करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या प्राथमिक टप्प्यात सुमारे २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, आगामी काळात १ हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.
उपग्रह प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने राज्यातील विविध ठिकाणांची प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे. अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील संधी, संशोधन आणि उद्योगांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आगामी फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘स्पेस फेस्ट’ आयोजित करण्यात येणार आहे.
०००

WhatsApp