Home ताज्या बातम्या देशातील १४५ जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट ठरू शकतात

देशातील १४५ जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट ठरू शकतात

नवी दिल्ली : देशातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. त्यात स्थलांतरित मजुरांची व्यवस्थित आरोग्य तपासणी होत नसल्याने नव्याने काही जिल्ह्यांमध्ये करोनाचा उपद्रव होण्याची भीती आहे. केंद्र सरकारने करोनाचे हॉटस्पॉट ठरू शकणाऱ्या देशातील १४५ जिल्ह्यांची यादी तयार केली आहे. विशेष म्हणजे यात ग्रामीण भागाशी संबंधित असलेल्या जिल्ह्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत.

केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी राज्यांच्या सचिवांची बैठक घेतली. या बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुढील संभावित हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांची माहिती दिली. बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशासह १२ राज्यांमध्ये फारसे करोना रुग्ण आढळून आले नव्हते. मात्र मागील तीन आठवड्यात या राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे समोर आलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. या राज्यामधील जिल्हे आगामी काळात करोनाच्या प्रादुर्भावाचे केंद्र असू शकतात, असे कॅबिनेट सचिव गौबा म्हणाले.

महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. गुरूवारपर्यंत देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी १ लाख ६५ हजार रुग्ण या राज्यातील आहेत. मागील १५ दिवसांपासून या राज्यांमध्ये जास्त रुग्ण आढळून येत आहेत. या राज्यातील रुग्णसंख्या अजूनही वाढत आहे, पण बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि ओडिशासारख्या राज्यांमध्येही रुग्णांमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

लॉकडाउननंतर करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या राज्यांमधून मजुरांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतरण केले. रेल्वे स्थानक, बस स्थानक आदी ठिकाणी मजुरांची व्यवस्थित आरोग्य तपासणी झाली नाही. या मजुरांच्या माध्यमातून करोनाचे विषाणू एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पोहोचला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.