नवी दिल्ली : देशातील 12 राज्यांमध्ये ‘एक देश, एक रेशन कार्ड’ ची योजना आजपासून सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे.
आज 1 जानेवारी 2020 पासून देशातील एकूण 12 राज्यांत ‘एक देश, एक रेशन कार्ड’ ची योजना सुरु करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, हरयाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये ही ‘एक देश, एक रेशन कार्ड’ ची योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच, जून 2020 पर्यंत देशातील सर्व राज्यांत ही योजना अंमलात आणली जाणार आहे, असे रामविलास पासवान यांनी सांगितले आहे.
दरम्यान, ‘एक देश, एक रेशन कार्ड’ ची योजना ई-पीओएस मशीनवर बायोमॅट्रिक आधारवर अवलंबून आहे. कामगार व दुर्बल घटकातील लोकांना या योजनेचा फायदा होणार आहे. ‘एक देश, एक रेशन कार्ड’ अंतर्गत देशातील कोणत्याही भागातून रेशन दुकानातून खाद्य सामान घेता येऊ शकणार आहे.