देशाला अभिमान वाटेल असे नंदुरबारचे जिल्हा संग्रहालय निर्माण करणार ; रौप्य महोत्सवी वर्षात विकासाचा सर्व बॅकलॉग भरून काढणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

देशाला अभिमान वाटेल असे नंदुरबारचे जिल्हा संग्रहालय निर्माण करणार ; रौप्य महोत्सवी वर्षात विकासाचा सर्व बॅकलॉग भरून काढणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
- Advertisement -

नंदुरबार : दिनांक २२ जुलै २०२३  (जिमाका वृत्त) – नंदुरबार जिल्ह्याला स्वतंत्र,समृद्ध आणि संपन्न असा इतिहास आहे. भारतातल्या कुठल्याही जिल्ह्यात नसेल एवढी बहुसांस्कृतिक अशी परंपरा या जिल्ह्याला लाभली आहे, त्यामुळे संपूर्ण देशाला अभिमान वाटेल असे नंदूरबार जिल्ह्याचे स्वतंत्र संग्रहालय निर्माण करणार असून या रौप्य महोत्सवी वर्षात जिल्ह्याच्या विकासाचा संपूर्ण बॅकलॉग भरून काढू, असे प्रतिपादन  राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निर्माण करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन भवनाच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जि.प. सभापती श्रीमती हेमलता शितोळे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी  मंदार पत्की, सा.बा. चे अधिक्षक अभियंता निलेश नवले, सा.बा. कार्यकारी अभियंता वैशाली पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटीया. विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, जिल्हा परिपूर्ण व्हावा यासाठी आपले निर्मितीपीसूनच प्रयत्न आहेत.जिल्ह्याला जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी सोयी-सुविधा देण्याचा आपला प्रयत्न आहे.

रौप्य महोत्सी वर्षात आवश्यक असलेल्या किमान 80 टक्के कामांना मंजुरी तरी मिळावी यासाठी प्रयत्न आहेत. नंदुरबार जिल्ह्यात सर्व कार्यालयांना मंजुरी देऊन सर्व कार्यालये कार्यान्वित करणार असल्याचे सांगून ते म्हणाले, बिरसा मुंडा योजनेतून जिल्ह्यात दीड हजार कोटीचे रस्ते वर्षभरात केले जाणार आहेत. रोप्य महोत्सवी वर्ष संपण्यापूर्वी  सर्व कामे पूर्णत्वास येतील असे नियोजन केले आहे.

सर्व विभाग प्रमुखांनी आपले विभागाचे काम चांगले करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात आपले संपूर्ण योगदान द्यावे असे आवाहनही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिले आहे.

नियोजन भवन सर्वांसाठी वास्तुपाठच – डॉ. सुप्रिया गावित

एखाद्या शासकीय भवनात कशा सोयी-सुविधा असाव्यात, त्यासाठी काय काय संरचना कराव्यात यासठीचा सुंदर वास्तुपाठ या नियोजन भवनाच्या माध्यामातून घालून दिला असल्याचे यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी सांगितले.

दर्जेदार नियोजन भवन पथदर्शी ठरेल – डॉ. हिना गावित

आयडियल नियोजन भवन कसे असावे याचा दर्जेदार नमुना आज लोकांना समर्पित केले जात असताना ते उर्वरित जेथे अशा प्रकारचे नियोजन भवन निर्माण होणार आहेत, त्यांच्यासाठी हे पथदर्शी ठरावे असे त्याची रचना आहे. अशा प्रकारचे प्रकल्प पाहुन भविष्यात या जिल्ह्याला विकसित जिल्ह्यांमध्ये आगळीवेगळी ओळख लाभेल याबद्दल विश्वास वाटतो, असे प्रतिपादन यावेळी खासदार हिना गावित यांनी केले.

दृष्टिक्षेपात नियोजन भवन

विभागात यापूर्वी नाशिक, जळगाव,धुळे,अहमदनगर या ठिकाणी स्वंतत्र नियोजन भवन निर्माण करण्यात आले आहे. शासनाने नंदुरबार जिल्ह्यासाठी दिनांक 16 एप्रिल 2015 रोजी त्यास सचिव समितीने मान्यता दिली. त्यानंतर दिनांक 18 एप्रिल 2022 च्या शासन निर्णयान्वये सदर प्रस्तावास पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या पाठपुराव्यामुळे सुधारित प्रशासकीय मान्यती देखील प्राप्त झाली.सदरचे  बांधकाम दिनांक 26 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आले. सदर नियोजन भवन हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाजातील एकूण 2251.15 चौ.मी.एवढे क्षेत्रफळावर दोन मजल्याचे अपेक्षित खर्चापेक्षा सुमारे १६ टक्के  कमी दराने म्हणजेच ₹ ४ कोटी ३४ लाख  खर्चुन निर्माण करण्यात आले आहे.

प्रामुख्याने तळमजला वाहनतळ,पहिल्या मजल्यावर कार्यालये आणि दुसऱ्या मजल्यावर जिल्हा नियोजन समितीचे बैठक हॉल बांधकाम करण्यात आलेले आहे.

नियोजन भवनामध्ये मध्ये 200 लोकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. बैठक कक्षामध्ये अत्याधुनिक यंत्रणसामुग्रीसह साऊंड सिस्टीम टिव्ही,प्रोजेक्टर, इत्यादी बाबींचा समावेश करुन बैठक हॉल तयार करण्यात आला आहे.

नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यानुसार सदर भवनामध्ये वारली पेन्टींगचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.पहिल्या मजल्यावर जिल्हा नियोजन समिती कार्यालय,जिल्हा मानव विकास समिती कार्यालय, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, तसेच अभिलेख कक्ष,बैठक कक्ष, इत्यादीचा समावेश करण्यात आलेला आहे.तळ मजला हा वाहन व्यवस्थाकरिता वाहन तळ ठेवण्यात आलेला आहे.संपूर्ण इमारतीसाठी आपत्कालीन व्यवस्थेसाठी फॉयर स्टिस्टीम लावण्यात आली आहे. तसेच सर्वसामान्य जनतेस तसेच अपंग व्यक्तीसाठी उदवाहक बसविण्यात आलेली आहे.जिल्ह्याच्या भविष्याकालीन बाबीचा विचार करुन जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच तसेच कार्यालयातील भविष्यात वाढणारी अधिकारी व कर्मचारी यांची संख्या विचारात घेवून सूसज्ज अशी इमारत तयार करण्यात आलेली आहे.सदर नियोजन भवन विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची इमारत तयार झाल्याने या ठिकाणी शासकीय कामानिमित्त येणा-या येणाऱ्या जनतेस उपयोगी पडेल अशी वास्तू तयार झालेली आहे.

000

- Advertisement -