Home ताज्या बातम्या देहूगाव-नो-एण्ट्री

देहूगाव-नो-एण्ट्री

देहूगाव : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देहूगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. श्री क्षेत्र देहूगावातील नागरिक बाहेर जाऊ नये तसेच बाहेरील व्यक्‍तींनी गावात येऊ नये यासाठी गावात येणारे सर्व मार्ग बॅरेकेट्‌स, बांबू बांधून बंद करण्यात आले आहेत.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी, जमावबंदी टाळेबंदी करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या वेळेतही नागरिक भटकत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अद्यापही नागरिकांना याबाबतचे गांभीर्य नसल्याने बाहेरून येणारी वाहने व वाढती वर्दळ याचा विचार करत देहू ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांच्या मागणीवरून गावात येणारे सर्व रस्त्यांवर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्‍यक सेवेसाठी फक्‍त जुन्या पालखी मार्गाचा वापर करण्यात येणार आहे.

यामध्ये वैद्यकीय, रुग्णवाहिका, दूध सेवा, पोलीस प्रशासन, घरगुती गॅस, पेट्रोल-डिझेलची वाहने तसेच शासनाने परवानगी दिलेल्या जीवनावश्‍यक सेवा यांचा समावेश वगळता सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. या वाहनांनी ही सहकार्य करत परवाने पास दाखवावे तसेच इतरांनी सहकार्य करण्याचे तसेच ग्रामस्थांनी नागरिकांनी घराबाहेर येवू नये प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही ग्रामपंचायत प्रशासनाने केली आहे.