मुंबई: पावसाळयाला सुरुवात होताच आजारांचे प्रमाणही वाढण्यास सुरुवात होते. चिखल, साचलेलं पाणी अशा अस्वच्छ परिसरात साथीच्या आजारांचा जोर वाढतच जातो. गेल्या काही दिवसांत सर्दी-खोकला आणि साधा ताप या आजारांनीच नाही तर मलेरिया, डेंग्यू अशा जीवघेण्या आजारांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं दिसतंय. रुग्णालयांमध्ये मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात ३३ हजार ५३५ नागरिकांनी रक्त तपासणी केली असून यामध्ये ८३ नागरिकांना डेंग्यू झाल्याचे निदर्शनास आले. बीएमसीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यातच डेंग्यूचे आठ तर मलेरियाचे १४६ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच गॅस्ट्रोचे ४६७, कावीळचे १३८, लेप्टोस्पायरोसिसचे २१ रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
ठाणे मनपा क्षेत्रात ४७, कल्याण मनपा क्षेत्रात १२, उल्हासनगर मनपा क्षेत्रात ३, भिवंडी मनपा क्षेत्रात ९, मीरा भाईंदर मनपा क्षेत्रात ६, ठाणे ग्रामीण क्षेत्रात २ तर नवी मुंबई मनपा क्षेत्रात ४ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाळ्यातील वातावरण साथीच्या आजारांच्या जीवाणूंसाठी पोषक असते. याच ऋतूत पाण्याचेही प्रदूषण वाढते. डासांचे प्रमाण वाढते. अशुद्ध पाणी व डास या आजारांची उत्पत्तीस्थाने आहेत. यावर नियंत्रण ठेवल्यास आजार नियंत्रणात येतील असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.
सध्या डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. यामध्ये लहान मुले आणि प्रौढांचे प्रमाण जास्त आहे. चेंबूर येथील झेन रुग्णालयाचे इंटर्नल मेडिसिन एक्स्पर्ट विक्रांत शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीमध्ये रुग्णालयात अशा प्रकारचे रुग्ण दाखल होत आहेत की ज्यामध्ये डेंग्युदृश्य लक्षणांपैकी रुग्णाला ताप नसतानाही घसा दुखणे, श्वास घेण्यास अडचणी निर्माण होणे अशी लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. चेंबूरमधील झेन हॉस्पीटलमध्ये गेल्या आठवड्यामध्ये डेंग्यूचे 10 संशयित रुग्ण दाखल झाल्याची माहितीदेखील यावेळी त्यांनी दिली. तर स्वाईन फ्ल्यूचे 16, टायफॉईडचे 4, मलेरियाचे 2, कावीळचे 2 रुग्णांची नोंद झेन हॉस्पीटलने केली आली आहे.
एसआरव्ही ममता हॉस्पीटल, डोंबिवलीचे जनरल फिजिशियन निर्मलदत्त ठाकूर यांनी डेंग्यूसारख्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविणे अधिक गरजेचे आहे असे सांगितले. डासांची उत्पत्ती रोखण्याकरिता प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरात आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात लहान मुलांना शाळेत पाठवितानाही डासांपासून बचाव करणाऱ्या उत्पादनांचा वापर करणे आवश्यक आहे. पावसाळा सुरु होताच साथीच्या आजारांचे रुग्ण तसेच तापाचे रुग्णांची नोंद याठिकाणी करण्यात आली आहे. खोकला, ताप, पोटदुखी, अंगदुखी यांसारखे आजार अंगावर काढू नका, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. रक्तचाचणीमध्ये डेंग्यू वा मलेरिया स्पष्ट झाल्यास त्यानुसार उपचार सुरू करायला हवेत. हे उपचार वेळीच न केल्यास अशक्तपणा येणे, ताप डोक्यात जाणे, शरीरातील पाणी कमी होणे, असा त्रास उद्भवतो असेही डॉक्टर सांगतात.
पाणी उकळून प्या
पावसाळ्यात आपल्या घरी येणारे पाणी स्वच्छ असण्याची शक्यता फारच कमी असते. पाणी स्वच्छ करण्यासाठी अनेक घरात वॉटर फिल्टर वापरण्यात येतो. पण, त्याचा दर्जा कसा आहे आणि त्यातून पाणी कितपत निर्जंतूक होतं हा संशोधनाचा मुद्दा आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात पाणी उकळून पिण्याला पर्यायच नसतो. पाणी फक्त उकळूनही फायदा होत नाही. ते पुरेसं उकळण्याची गरज असते. उकळवून गाळलेलं पाणी पिण्यासाठी सुरक्षित असतं. घरातल्या लहान मुलांना हेच पाणी देण्याची गरज आहे.
अशी घ्या काळजी
आपल्या आजूबाजूचा परिसर आणि घर स्वच्छ असणं हे गरजेचं आहे. अस्वच्छतेत रोगजंतूंची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे कुटुंबाचं आरोग्य टिकवण्यासाठी ही खबरदारीही महत्त्वाची आहे.
उघड्यावरचे पदार्थ नकोच
पावसाळ्याच्या काळात पचनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे या काळात खाण्यापिण्याबाबत काही पथ्य पाळणं आवश्यक असतं. प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे आपलं शरीर अनेक आजारांचं आश्रयस्थान होऊ शकतं. त्यामुळे या काळात पालेभाज्या, फळभाज्या खायल्या हव्यात. हे अन्न पचायलाही हलकं असतं आणि शरीराला यातून आवश्यक पोषण मिळत असल्यामुळे तुमची प्रतिकारशक्तीही वाढते. उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळा.
प्रतिबंध कसा करावा
ताप आला, तर शॉर्टकट म्हणून मेडिकल शॉपमध्ये जाऊन औषध घेण्याचा ट्रेण्ड सध्या वाढतो आहे. पण, हे घातक ठरू शकतं. पावसाळा म्हणजे आजारांचा हंगाम असतो. अशा काळात डॉक्टरचा सल्ला घेतला, तर आजार थोडक्यात आवाक्यात येऊ शकतो. त्यामुळे आजाराचं प्रमाण कमी असताना डॉक्टरकडे जाणं योग्य ठरतं.