Home अश्रेणीबद्ध द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात पुन्हा दरड कोसळली

द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात पुन्हा दरड कोसळली

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील आडोशी बोगदा किमी 41/800 या ठिकाणी आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. रविवारी पहाटे या ठिकाणी दरड कोसळली होती. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात दरड कोसळत दगड व माती मार्गावर आल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काहीशी विस्कळीत झाली होती.

तीनच दिवसांपूर्वी रविवारी पहाटेच्या सुमारास या ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली होती, त्यानंतर मुंबईकडे जाणारी एक लेन सुरक्षेकरिता पत्रे लावत बंद करण्यात आली होती. सुदैवाने या घटनेत कसलीही हानी झाली नसली तरी द्रुतगती महामार्गावरील प्रवास पुन्हा धोकादायक ठरू लागला आहे. तीन वर्षांपूर्वी खंडाळा घाटातील आडोशी बोगदा व खंडाळा बोगदा परिसरात मोठय़ा प्रमाणात दरडी पडण्याच्या घटना घडल्या त्या यामध्ये काही प्रवासी व वाहनचालक मयत तसेच जखमी झाले होते.

या घटनांनंतर महाराष्ट्र सरकारने मोठय़ा प्रमाणात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सदर भागातील डोंगरांना सुरक्षा जाळीचे आच्छादन केले होते. सदर काम केलेल्या डोंगरा मधूनच आता पुन्हा एकदा दरड कोसळू लागल्याने या भागात देखिल सुरक्षा जाळी बसविण्याची मागणी प्रवासी व वाहनचालक करु लागले आहेत.