हायलाइट्स:
- पात्रता नसताना डॉक्टरनं केल्या मूळव्याधाच्या हजार शस्त्रक्रिया
- मुंबईत दादर येथे उघडकीस आला धक्कादायक प्रकार
- टॅक्सीचालकावरील शस्त्रक्रिया फसल्यानं लपवाछपवी उघड
गोरेगाव येथे राहणाऱ्या एका टॅक्सीचालक मुळव्याधाच्या त्रासाने हैराण झाला होता. यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरची शोधाशोध सुरू असतानाच त्याला इतर टॅक्सीचालकांनी दादर टी. टी. येथील गोपालराव पाईल्स सेंटरबाबत सांगितले. याबाबत टॅक्सीचालकाने अधिक माहिती घेतली असता मुंबईत ठिकठिकाणी या क्लिनिकचे ‘मूळव्याधीवर विनाशस्त्रक्रिया उपचार’ असे फलक झळकत असल्याचे दिसून आले. टॅक्सीचालकाने २० फेब्रुवारी रोजी पत्नीसह हे क्लिनिक गाठले. एकदा ड्रेसिंग करून डॉक्टर एस. मुकेश कोटा यांनी दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी क्लिनिकमध्ये गेल्यानंतर छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगून कोटा यांनी काही अवधीत शस्त्रक्रिया उरकली आणि २५ हजार रुपये टॅक्सीचालकाकडून घेतले. पत्नीसोबत टॅक्सीने घरी जात असताना शस्त्रक्रिया केलेल्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. टॅक्सीचालकाचे कपडे, टॅक्सीची सीट रक्ताने माखली आणि यामुळे तो बेशुद्ध पडला. पत्नीने टॅक्सी केईएम रुग्णालयात नेऊन पतीला दाखल करून घेतले.
वाचा: भयंकर! उंदराने डोळा कुरतडलेल्या ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू
केईएम रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर पडल्यानंतर टॅक्सीचालकाने लेखी तक्रार माटुंगा पोलिस ठाण्यात केली. डॉक्टर कोटा यांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे मलविसर्जनावरील नियंत्रण सुटल्याने डायपर वापरावे लागते. अयशस्वी शस्त्रक्रियेमुळे वाहनही चालविण्यासाठी बसता येत नसल्याने उदरनिर्वाह करता येत नसल्याचे टॅक्सीचालकाने तक्रारीत म्हटले होते. या तक्रार अर्जाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल सावंत यांच्याकडे देण्यात आला. तपासामध्ये त्याने याचप्रकारे अनेक शस्त्रक्रिया केल्याचे समोर आले. पोलिसांनी कोटा याला अटक करून चौकशी केली असता त्याने गेल्या तीन वर्षात जवळपास एक हजार शस्त्रक्रिया केल्याची माहिती दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
समितीच्या अहवालानंतर कारवाई
तक्रारीनंतर पोलिसांनी शस्त्रक्रिया तसेच डॉक्टर कोटा यांच्या पदवी संदर्भातील कागदपत्र महाराष्ट्र वैद्यकीय परिषद तसेच वैद्यकीय अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय, मुंबई यांच्याकडे पाठविण्यात आले. जे. जे. रुग्णालयामध्ये याबाबत तज्ञसमिती गठीत करण्यात आली. या समितीने २१ जून रोजी आपला अहवाल पोलिसांना सादर केला. एमबीबीएस डॉक्टर मूळव्याध संबंधित आजारावर शस्त्रक्रिया करू शकत नाहीत. मुळव्याधावर शस्त्रक्रिया करण्याकरिता डॉक्टरने एम. एस. सर्जरी ही अतिरिक्त शैक्षणिक अहर्ता धारण करणे आवश्यक आहे. डॉक्टर कोटा यांनी निष्काळजीपणा, हलगर्जीपणा केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.
वाचा: टीआरपीसाठी अर्णव गोस्वामींचे दासगुप्तासोबत संगनमत