ठाणे : सुनावणीदरम्यान आरोपीने थेट न्यायाधीशांवर पायातील चप्पल भिकरकावल्याची खळबळजनक घटना ठाणे न्यायालयात घडली आहे. ही चप्पल न्यायाधीशांच्या उजव्या खांद्याला लागली असून आरोपीने नायाधीशांना शिवीगाळही केली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश गायकवाड असं या आरोपीचे नाव असून शुक्रवारी दुपारी त्याला पोलीस बंदोबस्तात ठाणे न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. दरम्यान, न्यायाधीशांनी आरोपीला तुझा वकील आला आहे का? अशी विचारणा केली. न्यायाधीशांच्या या प्रश्नांवर तुम्हीच मला वकील दिला असून तो येत नाही असे आरोपीने उत्तर दिले. तुला दुसरा वकील देतो, पुढच्या तारखेस केस चालवू न्यायाधीशांच्या या व्यक्तव्यानंतर गणेश याने स्वतःच्या पायातील चप्पल काढून न्यायाधीशांवर भिरकावली आणि शिवीगाळ देखील केली.
ही चप्पल न्यायाधीशांच्या उजव्या खांद्याला लागली असून बंदोबस्तावरील पोलिसांनी तात्काळ आरोपी गणेशला ताब्यात घेत न्यायालयातून बाहेर नेले. बाहेरही आरोपी न्यायाधीशांना मोठ – मोठ्याने शिवीगाळ करत होता. न्यायाधीशांच्या आदेशानंतर न्यायालयातील शिपायाने दिलेल्या तक्रारीनंतर सायंकाळी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.