हायलाइट्स:
- अपहरणानंतर १० लाखांची खंडणी घेऊनही लोक जनशक्ती पक्षाच्या नेत्याची हत्या
- बिहारमधील पूर्णिया येथील खळबळजनक घटना
- नातेवाइकांचा संताप, मृतदेह चौकात ठेवून केले आंदोलन
- पोलीस अपयशी ठरल्याचा नातेवाइकांचा आरोप
पूर्णिया येथून लोक जनशक्ती पक्षाचे नेते अनिल उरांव यांचे २९ एप्रिल रोजी अपहरण करण्यात आले होते. या अपहरणानंतर अनिल यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका करून अनिल यांना घेऊन येणार असल्याचे आश्वासन पोलिसांनी कुटुंबीयांना दिले होते. मात्र, रविवारी सकाळी कृत्यानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डंगराहा गावाजवळ अनिल यांचा मृतदेह आढळला. पोलिसांना माहिती मिळताच, ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. शवविच्छेदनानंतर नेत्याचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. त्यानंतर संतापलेल्या कुटुंबीयांनी मृतदेह आरएन साहू चौकात ठेवला. तेथे तीव्र संताप व्यक्त केला. आरोपींना १० लाखांची खंडणी दिली होती. तरीही अनिल उरांव यांची हत्या केली, हे पोलिसांचे अपयश आहे, असा आरोप कुटुंबीयांनी केला. उरांव हे बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आणि समर्थकांनी पूर्णिया शहरात आंदोलन केले होते. पूर्णियामध्ये उरांव हे खूपच सक्रिय होते. येथील मनिहारी विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवत होते.