Home शहरे पुणे धरणातून पाणी साेडल्याने पवना नदीला पूर ; अनेक गावांचा संपर्क तुटला

धरणातून पाणी साेडल्याने पवना नदीला पूर ; अनेक गावांचा संपर्क तुटला

0

किवळे : पवना धरणातून सोडण्यात आलेले पाणी व मावळात पडत असलेला मुसळधार पाऊस  कोसळत असल्याने किवळे, मामुर्डी , गहुंजे व सांगवडे परिसरात पवना नदीला पूर आला आहे. धामणेतील पूलासह  गहूंजे-साळुंब्रे , मामुर्डी-सांगवडे हे दोन्ही  साकव पूल पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पवना नदी पात्र सोडून वाहत आहे. नदीलगतच्या  सखल भागासह शेतात मोठ्या प्रमाणात  पाणी पसरले आहे. भात खाचरे वाहून गेली आहेत.  रावेत बंधाऱ्याहून जोरदार पाणी वाहत आहे. धामणे, सांगवडे व गहूंजेसह महापालिकेच्या मामुर्डी व किवळेतील स्मशानभूमी, निवारा शेड पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मावळ परिसरात दमदार पाऊस पडत असून किवळे व मामुर्डी येथील स्मशानभूमी ,निवारा शेड व परिसर पाण्याने पूर्णपणे व्यापला होता. किवळेतील वर्दळीच्या विविध रस्त्यावर पाणी वाहताना दिसत होते. ओढे व नाले तुडुंब भरून वाहताना दिसत होते. विविध रस्त्यांवर पाण्याची तळी दिसत आहेत. किवळे ते मामुर्डी दरम्यानच्या द्रुतगती महामार्गाच्या भूयारी मार्गात ,किवळे उड्डाणपूलाखाली पाणी साचल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत होती. द्रुतगती मार्गाने गहुंजेतील क्रिकेट स्टेडियमकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर विविध ठिकाणी पाण्याची तळी साचली होती. 

भात खाचरे झाली फुल्ल; भात खाचरे गेली वाहून, सखल भ्रागात , शेतात पाणी 

जोरदार पावसाने भात खाचरात व शेतात पवना नदीचच्या पुराचे पाणी शिरल्याने  किवळे व गहुंजे परिसरातील काही शेतकऱ्याची भात खाचरे पाण्याने फुल्ल झाली आहेत. काही वाहून गेली आहेत.भात खाचरांचे  मोठे नुकसान झाले आहे. किवळेत आंब्याच्या बागेसह एक फार्म हाऊस , परिसरातील भात खाचरात  नदीचे पाणी शिरल्याने भात शेतीचे नुकसान झाले आहे.