धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावर कोणतेही तडे, खड्डे नाहीत – महासंवाद

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावर कोणतेही तडे, खड्डे नाहीत – महासंवाद
- Advertisement -

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावर कोणतेही तडे, खड्डे नाहीत – महासंवाद

  • प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मास्टिकचे अतिरिक्त आवरण
  • मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हा पूर्णपणे सुरक्षित

मुंबई, दि. २१: बृहन्मुंबई महानगरपालिकेने बांधलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प अंतर्गत हाजी अली येथील पुलावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण केल्याची दृश्ये तसेच छायाचित्रे प्रसारमाध्यमातून प्रसारित होत आहेत. त्यावरुन प्रकल्पाच्या बांधकामात दोष असल्याचे आरोप प्रसारमाध्यमातून केले जात आहेत. या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून ठामपणे नमूद करण्यात येते की, सदर आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हा प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित असून, या रस्त्यावर कोणतेही तडे अथवा खड्डे नाहीत. सध्या प्रसारमाध्यम व समाजमाध्यमांतून प्रसारित होत असलेल्या चित्रफितींमध्ये किनारी रस्त्यावर दिसणारे पट्टे (पॅचेस) हे मुळात खड्डे प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाकलेल्या मास्टिकच्या आवरणाचे आहेत. येत्या १५ ते २० दिवसांत या मार्गांचे स्वरुप पूर्ववत करण्यात येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे.

याअनुषंगाने नागरिकांमध्ये गैरसमज पसरु नयेत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण करण्यात येत आहे.

मुंबई किनारी रस्ता अंतर्गत उत्तर दिशेने जाणारा मार्ग (चौपाटी ते वरळी) हा जुलै २०२४ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यापूर्वी त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. डांबरीकरणाच्या काही भागांमध्ये सांधे रुंद झाले होते. हे सांधे आणखी रुंद होवू नये आणि डांबरीकरण पूर्णपणे मजबूत रहावे, टिकावे यासाठी त्यावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण ठिकठिकाणी टाकण्यात आले आहे. कारण पावसाळा सुरु झाल्यानंतर, सततच्या व जोरदार पावसामुळे डांबरीकरणाचे नुकसान होवू नये, रस्त्यांवर खड्डे होवू नयेत, हा त्यामागचा हेतू आहे. या ठिकाणी आता अस्फाल्टचा नवीन थर निकषानुसार देण्यात येणार आहे. येत्या १५ ते २० दिवसांत या मार्गांचे स्वरुप पूर्ववत करण्यात येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे.

वरळी ते चौपाटी या दक्षिणवाहिनी मार्गावर मास्टिकचे आवरण टाकलेले नाही, हे नागरिकांनी व प्रसारमाध्यमांनी कृपया लक्षात घ्यावे. कारण सदर दक्षिणवाहिनी मार्ग मार्च २०२४ मध्ये खुला करण्यात आला. परिणामी, त्यावरील डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी मजबूत होण्यास पुरेसा अवधी मिळाला. सबब, प्रकल्पातील मार्ग बांधणीमध्ये कोणताही दोष नाही, हे सिद्ध होते.

उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता, सर्व मुंबईकरांना, नागरिकांना तसेच प्रसारमाध्यमांना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात येते की, कृपया कोणत्याही अपुऱया माहितीवर तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प हा मुंबई व महाराष्ट्रासह देशाच्या पायाभूत सुविधांमधील आगळावेगळा मानदंड प्रस्थापित करणारा प्रकल्प आहे. त्याच्या अभियांत्रिकी बांधणीबाबत, बांधकाम दर्जाबाबत आणि एकूणच सुरक्षेबाबत कृपया कोणत्याही शंका बाळगू नयेत, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

०००

- Advertisement -