हायलाइट्स:
- धारावीत मिळाला मोठा दिलासा
- आज एकाही करोना रुग्णाची नोंद नाही
- दादर, माहिममध्येही रुग्णसंख्येत घट
गेल्यावर्षी करोनाच्या पहिल्या लाटेत धारावीत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत होते. दररोजची रुग्णसंख्या अंदाजे ४००हून अधिक नोंदवली जात होती. यावेळी पालिकेने ‘मिशन झिरो’, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ यासह विविध प्रकारच्या उपाययोजना राबवल्या. परिणामी यंदाच्या जानेवारीपर्यंत धारावी करोनामुक्त झाली. करोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीत संसर्ग पुन्हा वाढू लागला होता. मात्र आधीच्या अनुभवावरून पालिकेने उपाययोजना आणखी बळकट करत संसर्ग नियंत्रणात आणला.
गेल्या महिन्याभरापासून धारावीत एक ते वीसपर्यंत नवीन रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून एक ते दोन रुग्णांची नोंद झाली. धारावीतील करोना साथीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आज धारावीत एकही करोनाचा रुग्ण सापडला नाहीये. धारावी विभागात आतापर्यंत करोनाबाधित ६८६१ रुग्णांची नोंद झाली आहे.
वाचाःकोल्हापूरमधील निर्बंधांबाबत अजित पवारांचे मोठे विधान; म्हणाले…
धारावीपाठोपाठ दादर आणि माहीममधील करोनाचा संसर्ग नियंत्रणात येतो आहे. दादर भागात आतापर्यंत ९ हजार ५५७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज फक्त ३ रुग्ण सापडले आहेत. तर, माहिममध्ये आज दिवसभरात सहा रुग्णांची नोंद झाली आहे.
वाचाः ‘…तर यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांना जाब विचारायलाही मागे-पुढे पाहणार नाहीत’
दरम्यान, मुंबईत करोना संसर्गाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या सध्या ७००च्या आसपास असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.१० टक्के इतका खाली आला आहे तर रुग्णदुपटीचा कालावधी वाढून तब्बल ६५३ दिवसांवर पोहचला आहे.
वाचाः आम्ही चंद्र, सूर्य मागत नाही; अजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराज बोलले!