Home शहरे अकोला धार्मिक व जातीय सलोखा कायम ठेवावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

धार्मिक व जातीय सलोखा कायम ठेवावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
धार्मिक व जातीय सलोखा कायम ठेवावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘शिवसृष्टी’चे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण

नाशिक : दिनांक २ मे २०२२ (जिमाका वृत्त ) – महाराष्ट्र हे थोर समाजसुधारकांच्या विचार व कार्याची परंपरा लाभलेलं पुरोगामी राज्य आहे. इथं एकमेकांचा धर्म-जात-पंथाचा नेहमी आदर केला जातो. तेव्हा राज्य प्रगतीपथावर कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी जातीय सलोखा कायम ठेवावा. असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.

पर्यटन विभागाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजना आणि नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या माध्यमातून नाशिक (पूर्व) सार्वजनिक बांधकाम विभागाने येवला येथे उभारलेल्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाचं भूमिपूजन व कोनशिला अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, आ.किशोर दराडे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, श्री.छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार व कार्याचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. शिवाजी महाराजांनी शेतकरी, कष्टकरी व रयतेचे स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या सोबत अठरापगड जाती व धर्माचे लोक होते. छत्रपतींच्या या मूल्यांवर राज्य सरकार कमी करतं आहे. येवला येथे साकारतं असलेली शिवसृष्टी भव्य-दिव्य झाली पाहिजे. शिवसृष्टी च्या माध्यमातून येवलाच्या पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे‌. त्यामुळे ‘शिवसृष्टी’च्या कामात निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना आश्वसत केले.

करोनाच्या मागील दोन‌ वर्षाच्या काळात राज्य सरकारने अनेकांना संकटातून बाहेर काढण्याचे काम केले. विकासकामांना खीळ बसू दिली नाही. राज्यातील जनतेला गॅस सिलिंडर स्वस्तात मिळावा म्हणून टॅक्स कमी केला.असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, राज्यातील वातावरण ‌निकोप व शांततेचे असल्यावर परदेशातील उद्योजक त्या राज्यात गुंतवणूक करतात. आपल्याला राज्याचे वातावरण निकोप ठेवून विकासाकडे घेऊन जाययचे आहे. ‘शिवसृष्टी’ च्या माध्यमातून निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य व पराक्रम , त्यांच्या सेनापती व मावळे यांच्या त्याग व निष्ठेचा इतिहास नवीन पिढीपुढे जाणार आहे. अशी आशा ही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

शिवसृष्टी मुळे येवल्याच्या सांस्कृतिक व सामाजिक वैभवात भर – पालकमंत्री छगन भुजबळ

पालकमंत्री श्री.भुजबळ म्हणाले, आज शासनाच्या माध्यमातून येवला येथे भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, थोर स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारके व वैशिष्ट्यपूर्ण कामे उभारण्यात आली आहेत. त्यात आता ‘शिवसृष्टी’ च्या रूपाने येवल्याच्या सांस्कृतिक व सामाजिक वैभवात भर पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन काम केले. त्यांच्याबरोबर मुस्लिम धर्माचे लोकही होते. रायगडावर औरंगजेबच्या कबरी साठी जागा ही उपलब्ध करून दिली. महाराजांच्या अंगरक्षकात तीन मुस्लिम होते. कुराणाचा त्यांनी नेहमी सन्मान केला. आज खऱ्या अर्थाने महाराजांचा विचार अंगीकारण्याची आपणाला गरज आहे. असेही मंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी इंडियन आयडॉल विजेते नाशिक जिल्ह्यातील कलाकार प्रतीक सोनसे, ऋषिकेश शेलार व आम्रपाली पगारे तसेच शिवसृष्टीचे वास्तू विशारद वैशाली सारंग पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. आभार कार्यकारी अभियंता पी.व्ही.पाटील यांनी मानले.

अशी असणार शिवसृष्टी

महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम व इतिहासाची आठवण करून देणारा शिवसृष्टी प्रकल्प येवल्यात लवकरच साकार होणार आहे. नाशिक-औरंगाबाद रस्त्यालगत विंचूर चौफुली जवळ ७४८६.६० चौरस मीटर जागेत ‘शिवसृष्टी’ उभारली जाणार आहे. नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी यापूर्वी १ कोटी ९९ लाख ३८ हजार रूपयांचा निधी मंजूर होता. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून सुधारित ३ कोटी ९९ लाख ४० हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे‌. असे एकूण ५ कोटी ९८ लाख ७८ हजार रूपयांच्या निधीत हा प्रकल्प साकार होत आहे. या प्रकल्पात श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचा १० फुट उंचीचा सिंहासनाधिष्ठीत मेघडंबरीसह पुतळा, महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना व त्यांचे सेनापती यांचे भित्तीचित्रांच्या माध्यमातून प्रदर्शन, माहिती केंद्र व कार्यालय, शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, ऑडिओ व्हिज्युअल हॉल, पुस्तक व साहित्य विक्री केंद्र, बगीचा अशा सुविधा असणार आहेत. सध्या शिवसृष्टीच्या जागेत अस्तित्वातील जीर्ण इमारत पाडणे, संरक्षक भिंत उभारणे, वाहनतळाचे क्रांक्रीटीकरण करणे, चौकीदार कक्षांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे‌ .
000