धार्मिक स्थळं उघडणार, Unlock 1.0 :सोमवारपासून असतील नियम!

- Advertisement -

मुंबई :अडीच महिने लॉकडाऊन मध्ये राहिल्यानंतर केंद्र सरकारने अनलॉक १.० ची घोषणा केली. या घोषणेनुसार टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानुसार येत्या ८ जूनपासून म्हणजेच सोमवारपासून देशभरात कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी मंदिरं आणि धार्मिक स्थळं सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, यासाठी पाळावयाच्या नियमांची यादीच केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाने जारी केली आहे. या नियमांनुसारच ही ठिकाणं उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने जरी मंदिरं आणि धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी दिली असली, तरी महाराष्ट्र सरकारने मात्र धार्मिक स्थळं आणि मंदिरं बंदच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जेव्हा राज्य सरकार मंदिरं उघडण्याचा निर्णय घेईल, तेव्हा मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीचं पालन करावं लागेल. यामध्ये प्रसाद देणे किंवा पवित्र पाणी शिंपडण्यावर बंदी असेल.

काय आहेत नियम?

१. मंदिरात प्रवेश करताना हँड सॅनिटायझर आणि थर्मल स्क्रीनिंग आवश्यक

२. फक्त मास्क किंवा फेस कव्हर घातलेल्या लोकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल

३. मंदिरातील मूर्ती किंवा ग्रंथांना प्रवेश करण्याची परवानगी नसेल. शिवाय दर्शनाच्या रांगेत उभं राहाताना किमान ६ फुटांचं अंतर असायला हवं

४. मंदिर आवारात कोरोनाविषयी जनजागृती करणारे पोस्टर्स लावले जावेत. शिवाय, अशी जनजागृती करणाऱ्या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप नियमितपणे चालवाव्यात

५. मंदिर आवार, पार्किंग अशा ठिकाणी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं जावं

६. मंदिर परिसरात दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं. यासाठी मंदिर प्रशासनाने देखील विशिष्ट चिन्ह किंवा तत्सम उपाययोजना कराव्यात*

७. मंदिर परिसरात स्वच्छतेवर विशेष लक्ष दिलं जावं

८. मंदिर किंवा धार्मिक स्थळांवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांचा रस्ता वेगवेगळा असायला हवा

९. मंदिर परिसर किंवा धार्मिक स्थळांवर सातत्याने सॅनिटायझेशन केलं जावं

१०. फरशी किंवा जमीन दिवसातून अनेकदा स्वच्छ केली जावी

११. मास्क, फेस कव्हर आणि हँड ग्लोव्ह्जची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जावी

१२. एसीमधील तापमान २४ ते ३० डिग्री सेल्सिअस असावे. त्याव्यतिरिक्त ताजी हवा आणि क्रॉस व्हेंटिलेशनची पुरेशा प्रमाणात सोय असावी

१३. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक स्वच्छतेच्या नियमांचं पालन केलं जावं. उदा. खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात ठेवणे, २० सेकंद साबणाने हात धुणे, थुंकण्यावर सक्त मनाई, मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे.

- Advertisement -