धुळे, दिनांक 27 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्त) : धुळे जिल्हा पोलीस दलाचे काम अत्यंत उल्लेखनीय असून येत्या काळात जिल्ह्यातील चारही तालुक्यात पोलिसांसाठी निवासस्थाने बांधण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
धुळे पोलीस दलातर्फे नव्याने तयार करण्यात आलेल्या जिल्हा पोलीस वेबसाईटचे उद्धाटन, मुद्देमाल हस्तांतरण सोहळा, धुळे मॅरेथॉन सीजन -3 टी-शर्ट तसेच लोगो अनावरण, उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार अनुपभैय्या अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरतीताई देवरे, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रतिभाताई चौधरी, जयश्री अहिरराव, चंद्रकांत सोनार यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री रावल म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम होत आहे हा अत्यंत स्तुत्य व प्रेरणादायी आहे. या सन्मानामुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळून पोलिसांची प्रतिमा जनसामान्यात उंचावण्यास मदत होणार आहे.
पोलीस हे 24 तास तणावात काम करत असतात त्यांना अनेकदा टिकेला तोंड द्यावे लागते. परंतू पोलीसांमार्फत झालेले चांगले काम जनतेसमोर येणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलीस विभागातील कर्तव्यदक्ष असलेला पोलीस व त्यांनी समाजासाठी केलेलं काम मांडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असल्याचा आनंद होत आहे. येत्या काळात सुद्धा धुळे जिल्ह्याला अभिमान वाटेल, राज्यात आपले नाव होईल असे काम यापुढे देखील करावे. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या अपेक्षेनुसार जनताभिमुख असे पोलीस दल झाले पाहिजे. त्यासाठी इंटरॲक्टिव्ह असे वेबपेज असले पाहिजे आणि महाराष्ट्रातील असं काम करणार पहिल माझ्या धुळे जिल्ह्याचे पोलीस दल आहे, याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
धुळे जिल्ह्यातील नागरिक हे शारीरिकदृष्टया तंदुरुस्त असले पाहिजे, यासाठी जिल्हा प्रशासन तसेच धुळे पोलीस दलामार्फत गेल्या तीनवर्षापासून धुळे मॅरेथॉन स्पर्धा घेत आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष साजरे करीत आहे. पोलीसांच्या माध्यमातून चोरी, मिसींग, पतीपत्नीचे भांडण, सामाजिक जातीय सलोखा असे अनेक लोकोपयोगी कामे होत आहे हे भुषणावह आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून 25 वर्ष तसेच जिल्ह्याचा एक भूमिपुत्र म्हणून आगामी काळात जिल्ह्यात चांगल्या कामास पाठिंबा देण्याचे काम त्याचबरोबर चुकीच्या गोष्टी रोखण्याचा काम देखील येत्या काळात करणार आहे. येत्या काळात जिल्ह्यातील पोलीस कार्यालयात नागरिकांसाठी बसण्याची व्य्वस्था, पंखा, लाईट, स्वच्छता, पाणी, शौचालय अशा मुलभूत व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर जिल्ह्यातील चारही तालुक्यात टप्पयाटप्यात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. पोलीस विभागाचे बॅन्ड पथक अतिशय चांगले असल्याचे कौतुक देखील त्यांनी केले.
जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.धिवरे म्हणाले की, 2024 मधील लोकसभा, विधानसभा निवडणूकीत पोलीसांवर प्रचंड ताण होता. त्यातच अनेक मान्यवरांचे दौरे असूनही धुळे पोलीस दलाने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. लोकसभा, विधानसभा कालावधीत आपल्याकडे अतिशय कमी गुन्हे दाखल झाले आहे. सन 2024 मध्ये 7 हजार 500 च्या वर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. त्यादेखील 2023 पेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जप्तीच्या (सीजर्स) च्या कारवाईत धुळे जिल्हा राज्यात आठव्या क्रमांकावर होता. भरोसा सेल मार्फत 239 कुटूंबाचे समुपदेशन करण्यात आले, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी पालकमंत्री श्री.रावल व मान्यवरांच्या हस्ते धुळे जिल्हा पोलीस दलाच्या नूतन वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला. तसेच धुळे पोलीसांनी गुन्ह्यांचा तपास लावून हस्तगत केलेले दागिने, मोबाईल तसेच विविध मुद्देमाल फिर्यादी, तक्रारदार यांना हस्तांतर, धुळे मॅरेथॉन सिझन-३ चे टी शर्ट व लोगोचे अनावरण तसेच धुळे जिल्हा पोलीस दलात विशेष उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांना प्रशस्तीपत्र वाटप करुन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती कल्याणी कचवाह यांनी तर अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांनी आभार प्रदर्शन केले.
असे आहे नविन संकेतस्थळ
धुळे पोलिसांचे नवीन आणि अद्ययावत अधिकृत संकेतस्थळ : https://dhulepolice.gov.in/ असे आहे. यात
- नागरिकांना तक्रारी मांडण्यास आणि मौल्यवान सूचना करण्यास सक्षम करणे.
- महत्वाची माहिती आणि आपत्कालीन संपर्क त्वरित प्रदान करणे.
- पारदर्शकता आणि विश्वास वाढवून पोलीस आणि जनता यांच्यातील बंध दृढ करणे.
0000000