
धुळे, दिनांक 19 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात उद्योग व्यवसायास पूरक वातावरण असून पायाभूत सोयी सुविधा, कुशल मनुष्यबळाची मोठी उपलब्धता असल्यामुळे आगामी काळात धुळे जिल्हा उद्योग हब होणार आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 28 एप्रिल रोजी धुळ्यात गुंतवणूकदारांची परिषद होणार आहे. या गुंतवणूक परिषदेस राज्यातील अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या आयोजनाबाबत पूर्वतयारी आढावा बैठक पालकमंत्री श्री.रावल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार अनुपभैय्या अग्रवाल, दूरदृष्यप्रणालीद्वारे आमदार अमरिशभाई पटेल, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थाक संतोष गवळी, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी डिंगबर पारधी, खान्देश औद्योगिक विकास परिषदेचे मुख्य प्रवर्तक नितीन बंग, खान्देश इंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट असोसिएशनचे सचिव भरत अग्रवाल, धुळे अवधान मॅन्यु. असोसिएशनचे नितीन देवरे, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष वर्धमान सिंगवी, मुकेश राठोड, प्रशांत देवरे, उद्योजक मोदी अग्रवाल, यांच्यासह विविध उद्योजक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.रावल म्हणाले की, राज्यात 1 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस मोठे प्रयत्न सुरु केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा सहभाग असला पाहिजे. या 1 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी मध्ये सामान्य माणसाची आर्थिक ताकदसुद्धा वाढली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकार प्रत्येक जिल्ह्यामध्ये गुंतवणूक परिषदेचा (इन्व्हेस्टमेंट) चा कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहे. देशातील सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्ग धुळे जिल्ह्यातून जातात, देशाच्या चारही दिशांना जोडणारे रेल्वेचं जाळं येथे तयार होत आहे. शैक्षणिक हब असलेला आपला धुळे जिल्हा असल्याने कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. धुळे जिल्ह्यात सोयाबीन, इलेक्ट्रॉनिक हब आहे. शिरपूर टेक्सटाइल, शिंदखेडा तालुक्यात फुड ॲण्ड फॉर्मर केंद्र विकसीत झाले आहे. साक्रीमध्ये 1 हजार मेगाव्हॅटचे सोलर प्रकल्प उभे राहिले आहे. तसेच धुळे जिल्हा मध्यप्रदेश, गुजरात राज्याला लागून आहे. जिल्ह्यातून वाढवण, जेएनपीटी बंदरास जोडणारे रस्त्यांचे जाळे आहे. त्याचप्रमाणे रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, सिंचनाची व्यवस्था जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. येत्या काळात उड्डाण योजनेत धुळ्यातील एअरपोर्ट विकसित करणार आहे.
धुळे जिल्ह्यात येत्या काळात जागतिकस्तराचे अँकर इंडस्ट्री उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यातील युवकांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. धुळे जिल्ह्याचे अनेक उद्योगपती हे वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे उद्योग निर्माण करतात. आता महाराष्ट्रभर, देशभरामध्ये आणि जगभरातील उद्योग हे पुढच्या काळामध्ये धुळे जिल्ह्यात उभे राहतील आणि धुळे जिल्हा मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसचं एक मोठं केंद्र म्हणून पुढच्या काळात भारतामध्ये उभा राहणार आहे. यासाठी 28 एप्रिल रोजी गुंतवणूकदारांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या गुंतवणूक परिषदेस राज्यातील अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
पालकमंत्री श्री.रावल यांनी बैठकीत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी गुंतवणूक परिषदेचे ब्रॅडींग करावे. मोठ्या उद्योजकांना गुंतवणूक परिषदेत आमंत्रित करण्यात यावेत. जिल्हा , तालुकास्तरावरील उद्योजकांना आंमत्रित करण्यात यावेत. त्याचप्रमाणे परिषदेत उत्कृष्ठ सादरीकरण करुन एक सकारात्मक वातावरण तयार करावे. एक खिडकी योजनेतून तसेच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून उद्योजकांना सहकार्य करण्यात येईल. उद्योजकांना जागा, वीज, पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. एमआयडीसीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. अशा सूचना दिल्यात. यावेळी पालकमंत्री श्री.रावल यांनी काही उद्योजकांशी दुरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधून गुंतवणूक परिषदेस येण्याचे आमंत्रित केले.
यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे आमदार अमरीशभाई पटेल, आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी गुंतवणूक परिषद यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या.