मुंबई, दि. ६ : पर्यटन विभाग, इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लि. (आयओसिएल) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी गेट वे ऑफ इंडिया येथील ‘ध्वनी आणि प्रकाश शो’ चे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
गेट वे ऑफ इंडियाच्या इमारतीवर ध्वनी आणि प्रकाश शो करण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागाने आयओसीएल आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत नुकताच सामंजस्य करार केला असून या कराराच्या अनुषंगाने कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत पर्यटन मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक बी. एन. पाटील, सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर, सहसचिव उज्ज्वला दांडेकर, इंडियन ऑयलचे कार्यकारी संचालक यु. पी. सिंह, ब्रॅण्डिंगचे कार्यकारी संचालक संदीप शर्मा, महाव्यवस्थापक अनिल मिश्रा, उपमहाव्यवस्थापक विजय गवारे, मुंबई महापालिकेच्या पुरातत्व विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सावंत, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, उपसचिव विलास थोरात उपस्थित होते.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, सामंजस्य करारामुळे गेट वे ऑफ इंडिया येथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याबरोबर स्थानिक संस्कृतीची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना देखील माहिती होईल. मुंबई महापालिकेअंतर्गत करण्यात येणारी कामे ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्यात यावीत. सामंजस्य कराराअंतर्गत येणारी कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत. यासाठी पर्यटन विभागाने सर्व संबंधित परवानग्या घेऊन काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
0000
संध्या गरवारे, वि.स.अ.