Home ताज्या बातम्या नंदुरबार,शहादा शहरांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी वेळेत खर्च करावा – पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार,शहादा शहरांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी वेळेत खर्च करावा – पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

0
नंदुरबार,शहादा शहरांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी वेळेत खर्च करावा – पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार,दि.4 मे 2023 (जिमाका वृत्तसेवा): नंदुरबार व शहादा नगरपालिकांना महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान व जिल्हा वार्षिंक योजनेतून मंजूर झालेला निधी विहीत वेळेत खर्च करण्याच्या सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आज दिल्या.

नंदुरबार नगरपरिषदेत आज पालकमंत्री डॉ.गावित यांनी नंदुरबार व शहादा नगरपरिषद व पालिकांच्या नविन प्रस्तावित कामांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस खासदार डॉ.हिना गावित, नंदुरबार न.प. मुख्याधिकारी पुलकित सिंह, शहादा नगरपालिकेचे स्वप्नील मुधलवाडकर आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री डॉ.गावित म्हणाले की, राज्य शासनाकडून तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून नगरपरिषदांना 115 कोटी रुपयांचा निधी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला असून मंजूर कामांचे अंदाजपत्रके, नकाशे, तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यतेचे प्रस्तावांना त्वरीत मंजूरी देवून हा निधी विहीत वेळेत खर्च करावा. नंदुरबार व शहादा नगरपालिका हद्दीतील जुन्या वसाहतींच्या ठिकाणी  नवीन रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. ज्या भागात रस्ते, वीज, गटारी व पिण्याच्या पाणी उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी नागरिकांना सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.  नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत रस्ते व डी.पी रोडची प्रस्तावित कामे त्वरित करावीत. पालिकेच्या मोकळ्या जागेत वाचनालय, युवक माहिती केंद्र, अभ्यासिकांची बांधकामे करावीत. आदिवासी उपयोजनेत तसेच अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेत मंजूर निधींची कामे करताना ज्या भागात या समूहांची लोकवस्ती असेल अशाच ठिकाणी निधी खर्च करण्यात यावा.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नंदुरबार, शहादा शहरातील सीसीटीव्ही प्रणाली लावण्यासाठी आराखडा तयार करावा. तसेच नंदुरबार व शहादा शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सिंग्नल व पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी आराखडा तयार करावा यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. बैठकीस नगरपालिका शाखेचे अधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित होते.