Home शहरे अकोला नदी साक्षरतेविषयी १९ मार्चला मुंबईत भव्य नृत्यनाट्याचे आयोजन

नदी साक्षरतेविषयी १९ मार्चला मुंबईत भव्य नृत्यनाट्याचे आयोजन

0
नदी साक्षरतेविषयी १९ मार्चला मुंबईत भव्य नृत्यनाट्याचे आयोजन

मुंबई, दि. 22 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेअंतर्गत ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना तथा खासदार हेमा मालिनी पावन गंगानदीविषयी नृत्यनाट्याचे भव्य सादरीकरण मुंबईत करणार आहेत. सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील एनसीपीए नाट्यगृहात 19 मार्च रोजी या भव्य नृत्यनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

खासदार हेमा मालिनी यांनी नुकतीच सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट घेतली, तेव्हा या कार्यक्रमाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या ‘चला जाणूया नदीला’ या जलसाक्षरता उपक्रमाविषयीची माहिती खासदार हेमा मालिनी यांना यावेळी दिली गेली. ‘गंगा नदीविषयी आपले हे नृत्य – नाट्यदेखील नदी साक्षरतेविषयी असल्याने ते ही या उपक्रमाचा भाग समजता येईल’, असे हेमा मालिनी यावेळी म्हणाल्या.

प्रधानमंत्री नरेंद्र  मोदी यांच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेअंतर्गत देशातील विविधतेतील सांस्कृतिक एकात्मता आणि भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ मूल्ये यांचे महत्त्व समाजासमोर पुन्हा एकदा अधोरेखित केले जाणार आहे. देशभरात सर्वत्र विविध कार्यक्रमांतून भारतीय संस्कृतीचे पैलू उजळले जातील.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/