Home गुन्हा नवऱ्याने गर्भवती पत्नीला ट्रेनमधून ढकलून दिलं!

नवऱ्याने गर्भवती पत्नीला ट्रेनमधून ढकलून दिलं!

0

मुंबई: नवऱ्याने आपल्या गर्भवती पत्नीला ट्रेनमधून ढकलून देण्याची धक्कादायक घटना घडली आहे. पश्चिम रेल्वेच्या दहिसर आणि मीरा रोड स्थानकांच्या दरम्यान हा प्रकार घडला. सागर धोडी (२५) असं या तरुणाचं नाव आहे. त्याची दुसरी पत्नी राणी हिच्याशी त्याचं ट्रेन प्रवासात भांडण झालं आणि त्याने तिला चक्क ट्रेनबाहेर ढकलून दिलं. ट्रेनची गती अतिशय धीमी होती त्यामुळे राणीने स्वत:चा जीव कसाबसा वाचवला. राणीने सांगितलं की ती सहा महिन्यांची गर्भवती आहे आणि तिचा पती सागरला हे मूल नकोय. याच कारणावरून त्यांच्यात गेल्या काही काळापासून सतत वाद होत होते. ट्रेनमध्ये हा जीवघेणा प्रकार घडल्यानंतर सागर तिथून पळून गेला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरवर खुना्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागरला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत. ते सर्व बोरिवलीला रावळपाडा येथे राहत होते. त्यानंतर त्याचं राणीवर प्रेम जडलं. सागर आणि राणीबद्दल कळताच सागरच्या पहिल्या पत्नीनं मुलांना सोबत घेऊन घर सोडलं. सागरने राणीशी १ नोव्हेंबरला लग्न केलं. लग्नाच्या वेळी राणी सहा महिन्यांची गर्भार होती. त्यांनी लग्न केलं असलं तर सागरला ते मूल मात्र नकोय. या सगळ्याला कंटाळून राणीने तिचं माहेरचं घर सोडलं. सागर तिला १५ नोव्हेंबरला भेटायला गेला आणि तिला त्याच्यासोबत नालासोपारा येथील मित्राकडे येण्यास सांगितलं. ती तयार झाली आणि त्यांनी बोरिवलीहून विरार ट्रेन पकडली.

‘राणी म्हणाली की ते ट्रेनमध्ये जनरल डब्यात दाराजवळ उभे होते आणि ट्रेनमध्ये चढल्याचढल्याच त्यांनी भांडायला सुरूवात केली होती,’ असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ट्रेनने दहिसर ओलांडलं तेव्हा सागरने तिला छातीवर एक ठोसा लगावला आणि नंतर ट्रेनमधून ढकललं. राणी ट्रॅकवर पडली. तिच्या पायांना, उजव्या हाताला आणि डाव्या डोळ्याला जखम झाली आहे. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिचं बाळ सुखरुप आहे. ती आता तिच्या आईसोबत राहात आहे.

दरम्यान, राणी निघून गेल्याचं कळताच सागरची पहिली पत्नी पुन्हा घरी परतली आणि तिने तिचा नवरा बेपत्ता असल्याची तक्रार कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलीस सागरच्या शोधात आहेत. तो रेल्वेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला नसल्याने तपासात अडथळे येत आहेत. त्यातच त्याची पहिली पत्नीदेखील तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.