पुणे दि.१६ :- वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी आणि गावपातळीपर्यंत ग्रंथालय पोहोचविण्यासाठी नवीन ग्रंथालयाचे अर्ज स्वीकारण्यास मंजूरी देण्यात आली असून लवकरच त्यासाठीचे अर्ज स्वीकारण्यास सुरूवात करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवनात आयोजित पुणे जिल्हा ग्रंथोत्सव-२०२२ च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, उपायुक्त राजेंद्र मुठे, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक सोपानराव पवार, उद्यम बँकेचे संचालक संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.
मंत्री श्री.पाटील म्हणाले, नागरिकांमध्ये वाचनाची आवड आहे, त्यांच्यापर्यंत चांगली पुस्तके पोहोचविल्यास वाचनाकडे वळतील. त्यामुळेच गाव तेथे ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रंथालयाच्या आवारात प्रदर्शनासाठी परवानगीची गरज नाही, असा निर्णयही घेण्यात आला आहे. ग्रंथ प्रदर्शन विविध ठिकाणी झाल्यास प्रदर्शनाच्या निमित्ताने वाचक आणि ग्रंथाची भेट होते, ते पुस्तक खरेदी करतात, वाचतात आणि त्यातील विचार इतरांना सांगतात. ही प्रकिया गतीमान होण्यासाठी वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचविण्याचे विविध उपक्रम ग्रंथालयांनी राबवावेत.
ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ करण्यासाठी ६६ कोटींची पुरवणी मागणी येत्या विधीमंडळ अधिवेशनात ठेवण्यात येणार आहे. ग्रंथालयांना विविध साहित्यविषयक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अनुदान देण्याचा विचार आहे. ग्रंथालयांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ग्रंथ खरेदीसाठी निधी देण्यात येईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्च त्यांना अनुदानातून भागविता येईल, असेही श्री.पाटील यांनी सांगितले. सार्वजनिक ग्रंथालयांच्या वर्ग बदलाच्या बाबतीत सूचना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
ग्रंथाना विसरलो तर मागे यावे लागेल – सदानंद मोरे
आधुनिक काळात कितीही प्रगती केली तरी ग्रंथांना विसरलो तर आपल्याला मागे यावे लागेल. ग्रंथांच्या माध्यमातून इतरांपर्यंत विचार पोहोचविण्याची प्रकिया सुरू रहायला हवी आणि त्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्वाचे आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी यावेळी केले.
ते म्हणाले, ग्रंथांचा उत्सव ही आनंदाची पर्वणी आहे. उत्सव साजरा करणे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. संत ज्ञानेश्वरांनी ‘सूर्ये अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची । तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करी’ असे म्हटले आहे, तर नामदेवांनी ‘नाचू किर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ अशा शब्दात ज्ञानाच्या उत्सवाचे वर्णन केले आहे. वेदांना सापडले नाही ते गातांना सापडले असे संत तुकाराम महाराज म्हणतात. संतांच्या या विचारातून उत्सवाचे महत्व लक्षात येते. सर्वांना सहभागी करून घेत ज्ञानाचा प्रवाह इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रंथांचा उत्सव महत्वाचा आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने कोरोना काळात २५ ग्रंथ प्रकाशित केले. ग्रंथ निर्मिती आणि वितरणाला शासनाचे सहकार्य मिळत आहे. शासनातर्फे दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून राज्यात नवी ग्रंथसंस्कृती निर्माण होण्यास चालना मिळेल असा विश्वास श्री.मोरे यांनी व्यक्त केला.
ग्रंथोत्सव हा सर्व ग्रंथाचा उत्सव आहे. सर्व सामान्यांपर्यंत ग्रंथालय चळवळ पोहचिण्यसाठी ग्रंथालय संघ काम करीत आहे असे श्री.पवार म्हणाले. ग्रंथोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे श्रीमती गोखले यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बालकिर्तनकार चैतन्यमहाराज थोरात यांचा सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी पालकमंत्री श्री.पाटील यांनी ग्रंथ प्रदर्शनाला भेट देऊन प्रत्येक दालनातून ग्रंथ खरेदी केली. फिरत्या ग्रंथालयाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.