Home शहरे अकोला नवीन पाणीपुरवठा योजनांच्या कामाला अधिक गती द्या – पालकमंत्री सुभाष देसाई

नवीन पाणीपुरवठा योजनांच्या कामाला अधिक गती द्या – पालकमंत्री सुभाष देसाई

0
नवीन पाणीपुरवठा योजनांच्या कामाला अधिक गती द्या – पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद, दि. 26 (जिमाका) : औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली शासनाची नवीन पाणीपुरवठा योजनांची कामे अधिक गतीने पूर्ण करण्याच्या सूचना उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

पैठण रोडवरील नक्षत्रवाडीतील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पाइप निर्मिती कारखान्याच्या पाहणी दरम्यान ते बोलत होते. यावेळी आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक तथा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे  मुख्य् अभियंता राम लोलापोट, अधीक्षक अभियंता अजय  सिंग,  उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

योजनेसाठी आवश्यक पाईप निर्मिती सुरू असली, तरी त्या कामाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत सुरू असलेल्या  कामांपेक्षा अधिक गतीने काम होणे अपेक्षित आहे. कंत्राटदाराला निर्धारीत केलेल्या वेळेतच काम पूर्ण व्हायला हवे. महाराष्ट्र  जीवन प्राधिकरण, पाणी पुरवठा विभागाने याबाबत अधिक लक्ष देऊन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करावेत. सद्यस्थितीतील कामकाज आणि कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासंदर्भात आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात येईल, असेही श्री. देसाई म्हणाले.

श्री.लोलापोट यांनी  सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती पालकमंत्री देसाई यांना दिली. तसेच श्री. देसाई यांनी संपूर्ण पाईप निर्मिती प्रक्रिया, योजनेच्या कामांची स्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या सूचनाही यंत्रणेतील अधिकारी, योजनेच्या कंत्राटदारांना दिल्या.