Home बातम्या नवीन वर्षातसोने ४२ हजार रुपये प्रती तोळ्याचा टप्पा गाठणार

नवीन वर्षातसोने ४२ हजार रुपये प्रती तोळ्याचा टप्पा गाठणार

0

२०१९ सालातील दिवाळीनंतर बघता बघता सोन्याने ४० हजारांचा आकडा पार केला. विशेष म्हणजे जुलै-ऑगस्ट महिन्यातील ऑफ सीझनमध्येदेखील हे भाव कमी न होता वाढत गेले होते. आजही भारतात बहुसंख्य जण सोन्यामध्येच गुंतवणूक करणे पसंत करतात. सोनेही किती महागले तरी जनसामान्यांमध्ये त्याचे आकर्षण आजही कमी झाले नाही, हेच यातून दिसते.

प्रत्येक भारतीयांचे खास आकर्षण असणाऱ्या सोन्याने मावळत्या वर्षात मोठी उच्चांकी गाठत ४० हजारांचा टप्पा ओलांडला. आता नवीन वर्षातही सोन्याचे भाव चढेच राहणार असून, त्यात वाढ होत जाऊन सोने ४२ हजार रुपये प्रती तोळ्याचा टप्पा गाठणार असल्याचे संकेत सुवर्ण व्यावसायिकांकडून दिले जात आहेत. वर्षभरात भाव कमी झाले तरी ते ३८ हजारांच्या खाली जाणार नाहीत. त्यामुळे सोने ३८ ते ४२ हजारांमध्ये राहणार असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, २०१९ या वर्षातील शेवटच्या दिवशी, ३१ डिसेंबर रोजी सोने ३९ हजार ६०० रुपयांवर पोहोचले असून, नवीन वर्षाचा पहिला दिवस ४० हजाराने सुरू होतो की काय, अशीही शक्यता सुवर्णनगरीतून व्यक्त केली जात आहे.

अमेरिका व चीनने सोन्याची खरेदी वाढविल्याने, तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे जून २०१९पासून सोने-चांदीचे भाव चांगलेच वाढत गेले. विशेष म्हणजे जुलै-ऑगस्ट महिन्यातील ऑफ सीझनमध्येदेखील हे भाव कमी न होता वाढत गेले व सोने ४० हजारांवर पोहोचले. वरील दोन मुख्य कारणांसोबतच वायदे बाजारात दररोज वाढीव भाव निघू लागल्याने सोन्याचे भाव वाढण्यास मदत होत गेली.

भाव कमी अशक्य
सध्या सोन्याचे भाव ३९ हजार ६०० रुपये प्रती तोळा असून, ते कमी झाले तरी ३८ हजारांच्या खाली जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. लग्नसराईमुळे मागणी जास्त असताना भाव जास्त राहतील व त्यानंतर ते कमी झाले तरी ३८ हजारांपेक्षा कमी होणार नाहीत, एवढे मात्र निश्चित असल्याचे सांगितले जात आहे.

जीडीपीचा परिणाम सोन्यावर
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात घसरण होतच राहिल्याने सोन्याचे भाव वाढत आहेत. त्यात आता देशाचा जीडीपी दरही घसरत असून मार्चपर्यंत तो सहा टक्क्यांपर्यंतही जाणे कठीण असल्याचे सांगितले जात असल्याने भारतीय रुपयावर त्याचा परिणाम होऊन त्याचे दर आणखी घसरण्याची शक्यता आहे. परिणामी सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
आंतरराष्ट्रीय मागणी जास्त
सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याला मोठी मागणी असून अमेरिका, चीन या देशांकडून अद्यापही सोन्याची मोठी खरेदी होत आहे. ही मागणी वाढतीच राहील. भारतातही मागणी कायम राहील. ग्राहकही सोन्यात गुंतवणूक वाढवीत असल्याने नवीन वर्षातील जुलै-आॅगस्ट महिन्यातील आॅफ सीझनमध्येही भाव जास्त राहू शकतात, असे चिन्ह आहे.

अमेरिका व चीनने सोने-चांदीची खरेदी वाढविण्यासह डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेल्या घसरणीने सोन्याचे भाव यंदा मोठ्या प्रमाणात वाढले. त्यातच वायदे बाजारात दररोज वाढीव भाव निघत असल्याने भाववाढीस मदत झाली. आता नवीन वर्षातही भाव चढेच राहणार असून, ते ३८ ते ४२ हजार रुपये प्रती तोळ्यामध्ये राहू शकतात.
– स्वरूप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन