Home बातम्या ऐतिहासिक नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन हस्तांतरणास शासनाची मंजुरी – मंत्री दादाजी भुसे

नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन हस्तांतरणास शासनाची मंजुरी – मंत्री दादाजी भुसे

0
नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन हस्तांतरणास शासनाची मंजुरी – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २० : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. या नवीन महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांच्या विस्तारीकरणांसाठी मौजे म्हसरुळ ता.जि. नाशिक येथील सर्व्हे नं. क्र. २५७ क्षेत्र १४.०० हे. आर. जागा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. याबाबत शासन ज्ञापन आज काढण्यात आले आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विद्यापिठाची स्वतःची पदवी व पदव्युत्तर संस्था सुरु करण्यासाठी दि. ०५ एप्रिल २०२१ रोजीच्या शासनाने मान्यता दिली होती. तसेच पदवी अभ्यासक्रमासाठीच्या पायाभूत सुविधांच्या आधारावर अत्याधुनिक अतिविशेषोपचार आरोग्य सेवा व संशोधनास चालना देण्यासाठी “महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन,  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यामुळे या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे नाशिकवासियांच्या आरोग्य सुविधांमध्ये भर पडणार असून उत्तर महाराष्ट्राचे वैद्यकीय महाविद्यालय, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था यांचे स्वप्न साकार होणार असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

लवकरच नवीन शासकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती मंत्री श्री. भुसे यांनी दिली.

0000