नवोदयच्या माजी विद्यार्थ्यांकडून 50 हजारची मदत
परवेज शेख
कोल्हापूर, दि. 24 (जि.मा.का.) : येथील जवाहर नवोदय विद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी 50 हजार रकमेचा धनादेश मुख्यमंत्री मदत निधीसाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे आज देण्यात आला.
जवाहर नवोदय विद्यालय ही कागलमधली निवासी सरकारी शाळा असून १९९३ सालापासून कार्यरत आहे. नुकताच शाळेने आपला पंचवीसावा वर्धापन दिन पण साजरा केला.
या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी २०१२ साली एक संघटना स्थापना केली. ही संघटना तेंव्हापासून शाळेच्या विकासासाठी तसेच सामाजिक कार्याच्या क्षेत्रात काम करत आहे. या संघटनेने आत्तापर्यंत अनेक ठिकाणी मेडिकल कॅम्प, जनजागृती अभियान चालवलेले आहेत. मागच्या वर्षीच्या पुरामध्ये संघटनेच्यावतीने १५ लाखाचे सामान पूरग्रस्तांना वाटण्यात आले होते.
जगभरात पसरलेल्या कोविड-१९ च्या विरुद्ध महाराष्ट्र राज्याच्या लढ्यामध्ये हातभार म्हणून या संघटनेने ५० हजार रुपयांचा चेक पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सुपर्द केला. हा चेक मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाईल आणि कोरोना बाधितांच्या मदतीसाठी वापरला जाईल. चेक देताना जवाहर नवोदय विद्यालय कोल्हापूर माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष किरण देशपांडे, ट्रेझरर राहुल कांबळे, जॉईंट सेक्रेटरी प्रवीण माळी, सदस्य जितेंद्र रावण आणि महेश सावंत उपस्थित होते.
00000