नव तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभाग अधिक सक्षम करावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

नव तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभाग अधिक सक्षम करावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
- Advertisement -

पुणे दि. 4: महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून पारदर्शक व गतिमान कामकाजा सोबतच नवतंत्रज्ञानाचा वापर करून, महसूल विभाग अधिक सक्षम  करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले महसूल क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार येथील हॉटेल ऑर्चिड येथे दोन दिवसीय महसूल क्षेत्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत  महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पुणे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, जमाबंदी आयुक्त  व संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले, महसूल विभागाने लोकाभिमुख व पारदर्शक काम करताना अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर भर द्यावा, एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) सारख्या या नवमाध्यमांचा वापर करुन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. या कामात आपला सहभाग अधिक असला पाहिजे, समाजाप्रती आपले काही देणे असून आपले कर्तव्य समजून प्रत्येकाने काम करावे, इतर राज्यात झालेल्या नाविन्यपूर्ण कामाप्रमाणे आपल्या राज्यात सुद्धा नवीन संकल्पना राबवून कामे व्हावीत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आय. ए. एस. अधिकाऱ्यांकडे खूप मोठा अनुभव असून त्या अनुभवाचा उपयोग विभागाला होण्याच्या दृष्टीने, त्यांनी सहभाग नोंदवावा, अधिकाऱ्यांच्या अभ्यासातून जर त्यांना काही नवीन बदल सुचवायचे असतील तर त्यावर शासन निश्चितच विचार करेल, तलाठी पासून  ते  वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत, सर्वांच्या सूचना ऐकून घेऊन विभागात गतिमान काम होण्याच्यादृष्टीने शासन निश्चितच प्रयत्‍न  करेल.

विभागातील विविध कामे करताना नियमात काम असेल तरच कामे करावीत, जर काम नियमात नसेल तर संबंधितांना लेखी कळवावे.नियमबाह्य कामे होता कामा नये याची दक्षता घ्यावी. या कार्यशाळे निमित्त प्रत्येक जिल्ह्याने शून्य हेरिंग (सुनावणी) संकल्प राबवून. सुनावणीचे प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत. माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या येत असतील तर त्याचे तात्काळ खंडन करुन त्याबाबतची वस्तुस्थिती माध्यमांना कळवावी. आपण केलेल्या चांगल्या कामांची माहिती माध्यमांना द्यावी, मीडियाच्या माध्यमातून चांगली कामे जनतेपर्यंत पोहोचून शासनाची  प्रतिमा अधिक  उजळ होण्यासाठी प्रयत्न करावे. आपल्याला तलाठी पासून ते उच्च अधिकारीपर्यंत एक परिवार म्हणून काम करायचे असून, लोकांच्या अडचणी समजून घेऊन अडचणींचे तात्काळ निराकरण केले जावे. चुकीची कामे करणाऱ्यांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही, सर्वांनी लोकहिताची चांगले कामे करावीत, चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक करून त्यांच्या सत्कार करण्यात येईल.त्यासाठी मी महसूल विभागाचा प्रमुख म्हणून मी नेहमी आपल्या पाठीशी उभा आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार प्रास्ताविकात म्हणाले, महसूल विभागाच्या कृती कार्यक्रमांतर्गत विभागाने बरेच कामे पूर्ण केले असून, अपूर्ण कामे काही दिवसात पूर्ण होतील. महसूल विभाग हा महत्त्वाचा विभाग असून सर्व विभागांशी निगडित आहे हा विभाग ब्रिटिश कालीन विभाग असला तरी, आता या विभागाच्या नियमांमध्ये बऱ्याचशा सुधारणा होत आहेत.

दोन दिवसीय कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करताना ते म्हणाले, या कार्यशाळेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्य पध्दतीची व विचारांची  एकमेकांना देवाण घेवाण व्हावी, तसेच जे परिविक्षाधीन जिल्हाधिकारी, तरुण जिल्हाधिकारी आहेत त्यांना चांगल्या कामांची माहिती व्हावी, त्यांना काम करताना प्रोत्साहन व ऊर्जा मिळावी. शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमात प्रत्येक जिल्ह्याच्या चांगल्या कामांची माहिती  दुसऱ्या जिल्ह्यांना व्हावी, तसे काम त्यांच्या जिल्ह्यामध्ये व्हावे या उद्देशाने कार्यशाळचे आयोजन करण्यात आले आहे असेही श्री. कुमार म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महसूलमंत्र्यांचे हस्ते भूमिअभिलेख विभागाच्या  बोधचिन्हाचे अनावरण, इस्पित, (इलेक्ट्रॉनिक्स प्रॉपर्टी सिस्टीम इंटिग्रेटेड टूल ) कार्यप्रणालीचे तसेच भू प्रमाण केंद्र, ई मोजणी व्हर्जन टू यंत्रणेचे अनावरण करण्यात आले. यावेळी जमाबंदी आयुक्त डॉ. दिवसे यांनी, भुमिअभिलेख विभागाच्या डिजिटल कार्य पद्धतीची माहिती विशद केली.

या कार्यशाळेला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सहायक‍ जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी आभार व्यक्त केले.

- Advertisement -