Home गुन्हा नागपुरातील मोस्ट वॉन्टेड बिल्डर हेमंत झाम जेरबंद

नागपुरातील मोस्ट वॉन्टेड बिल्डर हेमंत झाम जेरबंद

0

नागपूर : हजारो नागरिकांना सर्वसुविधांयुक्त सदनिका, बंगले स्वस्तात देण्याचे स्वप्न दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये घेणारा आणि नंतर पळून जाणारा कुख्यात बिल्डर हेमंत सिकंदर झाम (वय ३५) याला आज सकाळी सोनेगावातील एका आलिशान सदनिकेतून गुन्हे शाखेच्या पथकाने नाट्यमयरीत्या अटक केली. गेल्या तीन वर्षांपासून तो पोलिसांना वॉन्टेड होता.
झाम बिल्डरने पाच वर्षांपूर्वी सोनेगाव-हिंगणा परिसरात विस्तीर्ण परिसरात कन्हैया सिटी उभारण्याची जाहिरात करून हजारो लोकांना स्वस्तात सर्व सुविधांयुक्त घरे देण्याचे स्वप्न दाखवले. त्याच्या जाहिरांतीवर विश्वास ठेवून हजारो नागरिकांनी हेमंत झामकडे आपली आयुष्यभराची कमाई सोपवली. झाम याने विकत घेतलेल्या शेतात केवळ खड्डे आणि काही ठिकाणी पिल्लर उभे केले. नागरिकांकडून रक्कम घेताना त्याने दिलेला अवधी निघून गेला; मात्र सर्वसुविधांयुक्त घरे सोडा, तेथील जागेचे सपाटीकरणही त्याने केले नव्हते. त्यामुळे त्याच्याकडे रक्कम परत मागणाऱ्यांची गर्दी वाढली. प्रारंभी काही महिने त्याने वेगवेगळी कारणे सांगून नागरिकांची बोळवण केली, नंतर तो बाऊसर ठेवून पैसे परत मागणाऱ्यांना धमकावू लागला. त्यामुळे ४०० जणांनी त्याच्याविरुद्ध ग्राहक मंचात तक्रार नोंदविली. काहींनी पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यामुळे हेमंत झाम फरार झाला. सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास सोपविण्यात आला. पोलीस त्याचा शोध घेत होते. न्यायालयात त्याची तारीखवर तारीख सुरू होती. मात्र, झाम हजर राहत नव्हता. झामविरुद्ध अनेक ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यामुळे ठिकठिकाणचे पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्याकडे रक्कम गुंतविणाऱ्यांमध्ये केवळ नागपूरच नव्हे तर राज्यातील ठिकठिकाणचे आणि काही अनिवासी भारतीयांचाही समावेश होता. त्यामुळे झाम पोलिसांच्या लेखी मोस्ट वॉन्टेड ठरला होता.
अन् टीप मिळाली!
पोलीस ठिकठिकाणी झामचा शोध घेण्यासाठी जात होते. हेमंत झाम मात्र सोनेगावमधील साईनगरात ऐशोआरामात राहत होता. ही माहिती गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाला कळली. अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तीन दिवसांपासून तो नेमका कुठे दडून बसला आहे, ते शोधणे सुरू केले.
सोनेगावच्या साईनगरातील आर्चिड ब्लूम या इमारतीत दुसऱ्या माळ्यावर २०२ क्रमांकाच्या सदनिकेत तो दडून बसल्याची माहिती कळताच, शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास पोलीस इमारतीच्या चारही बाजूने उभे झाले. सदनिकेसमोर जाऊन पोलिसांनी झामला आवाज दिला. तो बाहेर येण्यास तयार नसल्याचे पाहून पोलीस दार तोडून आत प्रवेश करण्याच्या विचारात होते. मात्र, झामच्या सदनिकेचे प्रवेशद्वार एवढे भक्कम होते की पोलिसांना ते उघडणे जमलेच नाही. दुसरीकडे पोलीस धडकल्याचे पाहून झाम दुसºया माळ्यावरून उडी मारून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. परंतु, इमारतीच्या चोहोबाजूने पोलीस उभे असल्याचे पाहून त्याने अखेर शरणागती पत्करली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर आणि त्यांच्या सहकाºयांनी झामला अटक करून गुन्हे शाखेत आणले.
दिल्लीला पळून जाणार होता
मोस्ट वॉन्टेड झाम बिल्डरला अटक झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्येत गुन्हे शाखेच्या कार्यालयाकडे धाव घेतली. पोलिसांनी त्यांची समजूत काढून चौकशी करायची आहे, असे सांगून त्यांना परत पाठविले. हजारो गुंतवणूकदारांची आयुष्यभराची कमाई गिळंकृत करून त्यांना हवालदिल करणारा हेमंत झाम ऐशोआरामात जगत होता. तो राहत असलेली सदनिका किमान दीड ते दोन कोटी रुपये किमतीची असावी, असा अंदाज आहे. पोलीस त्याला इकडे-तिकडे शोधत होते आणि तो दिल्ली, मुंबईच्या वाऱ्याही करीत होता, असे समजते. तो एक-दोन दिवसानंतर दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत होता, अशी माहितीही संबंधित सूत्रांकडून पुढे आली आहे.