Home ताज्या बातम्या नागपुरात मोकाट जनावरांच्या मालकांना चाप : १० मालकांविरुद्ध गुन्हे दाखल

नागपुरात मोकाट जनावरांच्या मालकांना चाप : १० मालकांविरुद्ध गुन्हे दाखल

0

नागपूर : पशुपालक शहरातील विविध भागात मोकाट जनावरे सोडून देतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याची गंभीर दखल घेत महापालिकेने आता या पशुपालकांनाच चाप लावण्याची भूमिका घेतली आहे. बुधवारी मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलीस ठाण्यात पाच व यापूर्वी केलेल्या तक्रारीच्या आधारे पाच अशा एकूण १० जनावरे मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या जनावर मालकांविरुद्ध कारवाईचा विषय मनपा आयुक्तांनी गंभीररीत्या घेतला असून, जनावर मालकांना आपली जनावरे मोकाट न सोडण्याचे आवाहन महापालिकेद्वारे करण्यात आले आहे. शहरातील बाजाराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनावरे आढळून येत असल्यामुळे बाजाराच्या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. गीता गणेश सहारे, रा. इमामवाडा रोड, गुजरवाडी, अजमत अमनउल्ला खान, रा. लोधीपुरा बजेरिया, फिरोज नूर खान रा. लोधीपुरा हज हाऊस, गणेश नत्थूजी सहारे, इमामवाडा रोड, गुजरवाडी, सतीश शर्मा रा. सुभाष रोड, आग्याराम देवी रोड ही गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या सर्व लोकांनी त्यांची जनावरे कॉटन मार्केट परिसरात मोकाट सोडली होती. महापालिकेच्या पथकाद्वारे १९ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारीदरम्यान मोकाट जनावरांना पकडण्याची कार्यवाही करण्यात आली होती. संबंधित मालकांच्या जनावरांना पकडून मनपाच्या पथकाने बंदिस्त केले होते. या कारवाईनंतर जनावरांच्या मालकांनी त्यांना सोडविले. जनावर मालकांद्वारे जनावरे मोकाट सोडण्यात आल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला, यामुळे अपघाताची शक्यताही बळावली होती. यासंदर्भात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात मनपाने केलेल्या कारवाईची माहिती देत २५ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. जनावर मालकांवर मुंबई पोलिस कायद्यातील कलम ९० (अ), १०२, ११७ तसेच इतर प्रचलित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची विनंती करण्यात आली होती.
या तक्रारीच्या आधारे गणेशपेठ पोलिसांनी संबंधित जनावर मालकांवर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेच्या वतीने डॉ. गजेंद्र महल्ले यांनी १७ फेब्रुवारी रोजी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पाच जणांवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोठे शहराबाहेर बांधा
 जनावर मालकांनी शहराबाहेर गोठे बांधावीत, असे आवाहनही मनपाद्वारे करण्यात आले असून मोकाट जनावरांना बंदिस्त करण्याची मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून, ती अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.