नागपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठीचा एकत्रित प्रस्ताव पाठवा –  मदत व  पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

नागपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठीचा एकत्रित प्रस्ताव पाठवा –  मदत व  पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
- Advertisement -

मुंबई, दि. 27 :- नागपूर जिल्ह्यातील माहे ऑगस्ट-सप्टेबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, पिके, रस्ते फळबांगाचे अतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या भागातील नुकसानीचा एकत्रित प्रस्ताव पाठवावा  तसेच प्रलंबित प्रस्तावावर कार्यवाही करावी, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्या.

सिंहगड निवासस्थानी नागपूर जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत बैठक पार पडली. यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार,मृद व जलसंधारण सचिव दिलीप पांढरपट्टे, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, नागपूर विभागीय आयुक्त माधवी खोरे या दूरदृश्यप्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होत्या.

मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, माहे ऑगस्ट सप्टेंबर २०२१ मध्ये सततच्या पावसामुळे शेती पिक, रस्ते, फळबागा व रस्ते यांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सध्या शेतकरी  सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे अनेक संकटांना तोंड देत असून गत वर्षी सततचा पाऊस. गारपीट, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे पुरताच कोलमडून गेला होता. शहरी ग्रामीण भागातील रस्ते उखडले, वाहून गेले तसेच अतिवृष्टीमुळे बंधारे, तलावाला गळती लागली होती. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकावर किडीचा प्राद्रुर्भाव होऊन टोळधाड पहावयास मिळाली व प्रचंड नुकसान झाले येथील नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सूचना मदत व पनुर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.

मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, ७२ तासात एकूण पर्जन्यमान किती झाले पावसाची नोंद किती हे स्पष्ट झाली पाहिजे. तसेच नुकसान किती झाले हे मांडणे आवश्यक आहे. ३३% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी निकषानुसार व दरानुसार मदत केली जाईल. शेतीपिकाच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने निधी सर्व विभागीय आयुक्तांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जून ते आक्टोबर २०२० या कालावधीत अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकाच्या नुकसानीसाठी वाढीव दराने शासनाने मदत केली  आहे, असेही मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईच्या प्रलंबित प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करा पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार

पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार म्हणाले, नागपूर, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या २०१५ पासूनचे नुकसानभरपाईचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. तसेच गेल्या वर्षीही अतिवृष्टीमुळे शेती, पिके, रस्ते फळबांगाचे अतोनात नुकसान झाले याबाबत प्रशासनाने योग्य ते प्रस्ताव पाठवून यावरती कार्यवाही केली जावी. नागपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाच्या दुरूस्ती, अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांसाठीही ३६ कोटीचा निधी देखील उपलब्ध करून देण्यात यावा. अतिवृष्टीमुळे झालेली नुकसानभरपाईही लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी केली.

0000

- Advertisement -