Home ताज्या बातम्या नाल्यांत कचरा टाकल्यास २०० रुपये दंड

नाल्यांत कचरा टाकल्यास २०० रुपये दंड

0
नाल्यांत कचरा टाकल्यास २०० रुपये दंड

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

गेल्या २ दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची दैना उडाली आहे. नालेसफाईनंतरही शहरात पाणी साचत असल्याने महापालिकेवर टीकेचा भडिमार सुरू आहे. याची दखल घेत पालिकेने नाले आणि गटारांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर २०० रुपये दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष्य ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.

पालिका दरवर्षी नालेसफाईसाठी १०० कोटी रुपये खर्च करते. नद्या, नाले, गटारांच्या स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना आखल्या जातात. त्यानंतरही पहिल्याच पावसात मुंबईच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याची समस्या कायम असते. एकीकडे पालिका स्वच्छतेसाठी प्रयत्न करत असताना गटार, नाल्यांमध्ये काही नागरिक प्लास्टिकच्या पिशव्या, वस्तू, कचरा टाकतात. त्यामुळेच पावसाळ्यात हे नाले कचऱ्याने भरतात. महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या प्रकरणी तातडीची बैठक घेऊन दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

कारवाईपूर्वी जनजागृती

पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी पालिका अधिकाधिक प्रभावी व्यवस्था करीत असते. या अंतर्गत प्रामुख्याने पर्जन्य जलवाहिन्या, नालेसफाई, नवीन पर्जन्य जलवाहिन्या बसवून त्यांचे रक्षण करणे ही कामे नियमितपणे करण्यात येतात. मात्र नाले साफ केल्यानंतरही त्यात कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे नाल्यात पाणी तुंबण्याची शक्यता वाढते. विशेष करून प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे पाणी तुंबण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे आढळून येत आहे. कारवाईआधी विभाग स्तरावर जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिली.

नाल्यांची व्याप्ती

मोठे नाले- २४८ किमी

छोटे नाले- ४२१ किमी

मिठी नदी- २० किमी

Source link