Home ताज्या बातम्या नाशिकमधील ठक्कर डोम येथे ५०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले जाणार

नाशिकमधील ठक्कर डोम येथे ५०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले जाणार

पालकमंत्री छगन भुजबळ, महापालिका आयुक्त आणि क्रेडाई पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला निर्णय

नाशिक: दि. २१ जून २०२०  : नाशिक शहर व परिसरात कोविड १९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे क्रेडाईच्या सहकार्याने ५०० बेडचे सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

नाशिकमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी क्रेडाईच्या पदाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांची बैठक बोलावली होती. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, उपाध्यक्ष कुणाल पाटील, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, सदस्य अतुल शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत ठक्कर डोम येथे क्रेडाईच्या माध्यमातून ५०० खाटांचे कोविड केअर सेंटर साठी बेडसह सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी केली. त्यानंतर क्रेडाईच्या वतीने सदर कोविड केअर सेंटर साठी आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे क्रेडाई अध्यक्ष रवी महाजन यांनी सांगितले. तसेच या कोविड केअर सेंटर मध्ये महापालिकेच्या वतीने आवश्यक सर्व स्टाफ व आरोग्याच्या सुविधा पुरविण्यात येऊन महापालिका अधिकारी यावर नियंत्रण ठेवणार असल्याचे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

क्रेडाईच्या माध्यमातून कोविडच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका रुग्णालयात पाच डिजिटल एक्सरे मशीन, पाच इसिजी मशीन, १०० ऑक्सिमिटर, ५० थर्मल स्कॅनर,हेल्थ केअर यॅप, नाशिक जिल्हा रुग्णालयात प्रत्येकी १ हजार पीपीई किट, मास्क, नाशिक ग्रामीण पोलिसांना १००० पीपीई किट, मास्क , सॅनिटायझर, नाशिक शहर पोलिसांना ३५०० च्यवनप्राश बॉटल यासह पाच हजार गोरगरीब नागरिकांना अन्नधान्य तसेच शासकीय निमशासकीय कार्यालयात १०० सॅनिटायझर स्टँड, १० सॅनिटायझर बूथ यासह विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आता ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटर तयार करून देण्यात येत आहे असे क्रेडाई अध्यक्ष रवी महाजन यांनी यावेळी सांगितले.