नाशिकः दिनांक 17 (जिमाका वृत्तसेवा): शेतकऱ्यांसाठी कृषी व कृषी कल्याण मंत्रालयाच्या वतीने देशात 600 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र सुरू करण्यात येत आहेत. त्यातील नाशिकसह देशातील 6 राज्यांमधील प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे प्रातिनिधीक स्वरूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टीलायझर्स व नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील द्वारका पॉईंट, नवीन मुंबई-आग्रा रोडवरील कृषी भवन येथे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. या कार्याक्रमास आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मुंबईच्या राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास मुडगेरीकर, राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझरच्या कार्यकारी संचालिका सुनेत्रा कांबळे आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्यासाठी नवे तंत्रज्ञान, जमिनीच्या क्षमतेनुसार खतांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्यप्रणाली द्वारे पीएम किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण केले.
00000000000