Home ताज्या बातम्या नाशिक महापालिकेचे खत प्रकल्पातील ट्रेनिंग सेंटर आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्प चालविण्यास ‘महाप्रित’ उत्सुक

नाशिक महापालिकेचे खत प्रकल्पातील ट्रेनिंग सेंटर आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्प चालविण्यास ‘महाप्रित’ उत्सुक

0
नाशिक महापालिकेचे खत प्रकल्पातील ट्रेनिंग सेंटर आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्प चालविण्यास ‘महाप्रित’ उत्सुक

नाशिक, दि.२४: नाशिक शहरासाठी ईव्ही चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्याची महात्मा फुले नवीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रोद्योगिकी मर्यादित (महाप्रित) कंपनीने दर्शविली आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेचे ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प आणि ‘खत प्रकल्पातील ट्रेनिंग सेंटर’ चालविण्यास महाप्रित उत्सुक असल्याचे महाप्रितचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी यांनी सांगितले.

‘महाप्रित’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी नाशिक मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे भेट दिली. यावेळी त्यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.

मनपाचा वॉटर ट्रिटमेंट आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्प संपूर्णपणे सोलर तंत्रज्ञानावर विकसित करून त्यातून ऊर्जा बचत होईल, असे श्री. श्रीमाळी यांनी यावेळी सांगितले. ‘महाप्रित’ केंद्र सरकारच्या भागीदारीत ऊर्जा बचत, सौर ऊर्जा प्रकल्प, इलेक्ट्रिक वाहने व चार्जिंग स्टेशन प्रकल्प, प्रदूषण नियंत्रण अशा विविध प्रकल्पांमध्ये कार्यरत असून नाशिक येथे ईव्ही चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मनपाचे दोन प्रकल्प महाप्रितमार्फत चालविण्यासाठी सहमती दर्शवून याबाबत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. योजनांमध्ये मनपाला जास्तीतजास्त निधी मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बैठकीला महाप्रितचे कार्यकारी संचालक रविंद्र चव्हाण, महाव्यवस्थापक उमाकांत धामणकर, प्र. अतिरिक्त आयुक्त अर्चना तांबे, उपायुक्त मनोज घोडे-पाटील आदी उपस्थित होते.