Home बातम्या आंतरराष्ट्रीय ‘नासा’ला सापडला पृथ्वीसारखा ग्रह?

‘नासा’ला सापडला पृथ्वीसारखा ग्रह?

0

न्यूयॉर्क :आपल्या सूर्यमालेत अर्थात ‘मिल्की-वे’मध्ये आपल्या सूर्यमालेसारख्या अनेक सूर्यमाला आहेत, ग्रहगोल, तारेही आहेत आणि कृष्णविवरेही (डेड/फ्रोझन स्टार्स) आहेत. सध्या आपल्या सूर्यमालेत मानवाला राहण्यायोग्य ग्रहांविषयी संशोधनही सुरु आहे आणि मंगळासारख्या ग्रहावर पाण्याचे अंश आणि मिथेन वायू सापडल्याचे पुरावेही उपलबध झाले आहेत. मात्र, आपल्या सूर्यमालेबाहेर असा पृथ्वीसारखा ग्रह आहे काय, यावरही जगभर संशोधन सातत्याने सुरुच असते. अशातच आपल्या पृथ्वीपेक्षा सहा पट मोठा असा ग्रह ‘सुपर अर्थ’ खगोलशास्त्रज्ञांना सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.

अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नॅशनल एरॉनॉटिक्‍स ऍण्ड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन’ अर्थात ‘नासा’च्या ‘ट्रान्जिटींग एक्‍झोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाईट’ अर्थात ‘टेस्स’ या उपग्रहाला अशी ‘सुपर अर्थ’ सापडली आहे. हा ग्रह आपल्या पृथ्वीपासून फक्त 31 प्रकाशवर्षे दूर असून त्याचे खगोलशास्त्रीय नाव ‘जीजे-357 डी’ असे आहे. हा ग्रह हायड्रा कॉन्स्टेलेशन अर्थात पाण्याचा साठा असलेला एक ‘ड्‌वार्फ प्लॅनेट’ (छोटा ग्रह) असल्याचे येथील कार्ल सेगन इन्स्टिट्युटच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. हा कमालीचा थंड ग्रह असून सध्या त्यावर -53 अंश सेल्सियस इतके तापमान आढळून येत आहे. मात्र, या ग्रहाभोवतीच्या वातावरणाची जाडी पाहता, या ग्रहावर पृथ्वीवरील विशाल समुद्राइतके अथवा त्याहूनही अधिक प्रमाणात पाणी असण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. या ग्रहाचे वजन पृथ्वीपेक्षा कितीतरी पत अधिक असले तरी आपल्या सूर्यमालेतील ‘आईस जायंट्‌स’ अर्थात बर्फाळ अशा युरेनस आणि नेपच्युनपेक्षा ‘सुपर अर्थ’ उष्ण असल्याचे निष्कर्षही वैज्ञानिकांनी काढले आहेत.

अमेरिकेच्या ‘टेस’ या उपग्रहाने जुलै 2018 पासून आजपर्यंत अवकाशसंशोधनात मोठी मजल मारली आहे. सर्वसाधारणपणे 85 टक्के अवकाशाचा वेध या उपग्रहाने घेतला असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी अद्याप खूप मोठे क्षेत्र संशोधनापासून दूर आहे, असे मानले जाते. आपल्या सूर्यमालेबाहेरील 20 हून अधिक ग्रहांचा वेध ‘टेस’ या उपग्रहाने घेतला आहे.