हायलाइट्स:
- चंद्रकांत पाटील यांच्या धमकीच्या भाषेवर राष्ट्रवादीची तीव्र प्रतिक्रिया
- छगन भुजबळ यांना पाटील यांनी दिली होती अप्रत्यक्षरित्या धमकी
- पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी – मलिक
वाचा: …तर लसीकरण प्रमाणपत्रावर ‘जय महाराष्ट्र’ छापावे; तरुणाईची मागणी
पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर भुजबळ यांनी ममता बॅनर्जी यांचं तोंडभरून कौतुक केलं होतं. तसंच, मोदींची लोकप्रियता घटल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर पाटील यांनी छगन भुजबळ यांना जामिनावर सुटला आहात अशी धमकी दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावर मलिक यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. ‘आजपर्यंत भाजपकडून तपास यंत्रणांचा दुरुपयोग झाल्याचं सिद्ध झालं आहे. आता न्यायालयसुध्दा त्यांच्या बोलण्यावर काम करतंय की काय, असं वाटू लागलं आहे. छगन भुजबळ यांचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे, असा सवाल मलिक यांनी केला. चंद्रकांत पाटील अशा पद्धतीनं बोलत असतील तर न्यायालयानं सुमोटो अंतर्गत कारवाई करावी, अशी अपेक्षा नवाब मलिक यांनी केली आहे.
‘न्यायालयसुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असेल तर लोकशाही कुठेतरी संपली असं जाहीर करा. नाहीतर चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी, अशी आग्रही मागणी मलिक यांनी केली आहे.