वाचा:जितीन प्रसाद भाजपमध्ये; शिवसेनेनं राहुल गांधींना दिला ‘हा’ सल्ला
‘आहार’चे आधार शेट्टी यांनी मुंबईतील हॉटेल व्यवसायाची एकूण परिस्थिती सांगताना, मुंबईकरांची टेस्ट आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. करोना संसर्गामुळे बाहेर खाण्यापूर्वी मुंबईकर विचार करतात, असे निरीक्षण नोंदवले. चार वाजेपर्यंत हॉटेलमध्ये बसून खाण्यास संमती दिल्यामुळे शाकाहारी पदार्थांना मागणी आहे. त्यातही वेगळ्या प्रकारचे फॅन्सी पदार्थ मेन्यू कार्डमधून बाद करण्यात आले आहेत. कमी मनुष्यबळाच्या उपलब्धतेमध्ये जे हमखास खपणारे पदार्थ आहेत तेच बनवले जातात. त्यात इडली, पावभाजी, मसाला डोसा, मिक्स भाजी, चपाती, डाळभात, जिराराईस या पदार्थांना मागणी असते. मात्र त्याखेरीज इतर काही फ्युजनचे पदार्थ बनवले तर ग्राहकांची मागणी नसते, असे त्यांनी सांगितले. चेंबूरमधील दयानंद पाटील सांगतात, ‘खानावळींच्या व्यवसायालाही आता पूर्वीप्रमाणे प्रतिसाद मिळत नाही. जे मसालाडोसा, राईस प्लेटसाठी आग्रह धरत होते, ते आता वडापाव खायला पसंती देतात. आर्थिक मुद्दा आता महत्त्वाचा झाला आहे.
वाचा: केजरीवाल सरकार दिल्लीत राबवणार ‘मुंबई मॉडेल’
मांसाहारी पदार्थांची आवड असणारे शक्यतो दुपारी हॉटेलमध्ये जाऊन खाण्यासाठी पसंती देत नाही. दुपारी जड आहार घेतला तर झोप येते, कामाचा वेग कमी होतो असे लोकांना वाटते, असे निरीक्षण हॉटेल व्यावसायिक नोंदवतात. मांसाहारी पदार्थांना संध्याकाळी अधिक मागणी असते. मात्र चार वाजल्यानंतर डायनिंग बंद असते. त्यामुळे मांसाहारी पदार्थांसाठी येणारा ग्राहकवर्ग हॉटेल्सपासून दुरावला आहे.
पार्सल सुविधेचा आधार
पार्सल सुविधेमुळे हॉटेल व्यावसायिकांना वीस ते तीस टक्के आधार मिळाला आहे. मात्र त्यामध्येही शाकाहारी पदार्थांची ऑर्डर देण्याकडे असलेला कल अधिक आहे. शिवाय, उडपी हॉटेलांमध्ये कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक जण लॉकडाउनच्या काळामध्ये गावी निघून गेले आहे. त्यामुळे या हॉटेल्समध्ये मनुष्यबळाची अडचण मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या कशा प्रकारे वाढेल याची कोणतीही शाश्वती देता येत नसल्यामुळे गावी गेलेल्यांना हॉटेलच्या मालकांनी अद्याप परत बोलावलेले नाही.
वाचा: पन्नाशीनंतर ‘हेरिटेज ट्री’!; ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय