Home बातम्या निर्मळ तलाव अतिक्रमणांच्या विळख्यात

निर्मळ तलाव अतिक्रमणांच्या विळख्यात

0

 वसई: वसईतील ऐतिहासिक महत्त्व असलेला निर्मळ तलाव सध्या अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आल्यामुळे येथील तलावात सांडपाणी, कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे या तलावातील पाणीत दूषित होत असून या तलावाची पालिकेमार्फत स्वच्छता आणि अतिक्रमणे हटविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वसई पश्चिमेकडील भागात निर्मळ परिसर आहे. या ठिकाणी आद्य जगद्गुरू शंकराचार्य यांचे समाधी मंदिर आहे. त्यामुळे हा परिसर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखला जातो. त्यामुळे काही भाविक या पाण्यात स्नान करण्यासाठी येत असतात. परंतु सध्या या तलावाच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे तर दुसरीकडे या तलावाच्या ठिकाणी कपडे धुणे, सांडपाणी सोडणे, अनधिकृत बांधकामे यांसारख्या गोष्टी केल्या जात असल्याने तलावाचे पाणी दूषित होऊ लागले आहे. त्यामुळे हळूहळू या तलावाचे पावित्र्य धोक्यात येत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. सध्या जगद्गुरू शंकराचार्य यांच्या यात्रोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली असून हा सोहळा आठवडाभर सुरू राहणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या यात्रोत्सवाला येत असतात, यासाठी निर्मळ तलावाची स्वच्छता करून आजूबाजूला असलेले अतिक्रमण हटविण्यात यावे, या मागणीसाठी वसईचे शिवसेना नेते नितीन म्हात्रे व त्यांच्या शिष्टमंडळाने पालिकेचे आयुक्त बी. जी. पवार यांची भेट घेऊन लेखी स्वरूपात केली आहे. तसेच, निवेदनात तात्काळ उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर पालिकेचे आयुक्त बी. जी. पवार यांनीसुद्धा या तलावाची स्वच्छता करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यावेळी शिवसेना – भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.