निर्यातीसाठी जाणाऱ्या फळांचे, भाज्यांचे योग्य पद्धतीने पॅकेजिंग करावे लागते. बॉक्समध्ये कागदाचा लगदा, पेपर यांची गरज भासते. बॉक्स चिकटवण्यासाठी चिकटपट्या लागतात, त्यादेखील मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. या आवश्यक गोष्टी हव्या त्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने पॅकेजिंगमध्ये अडचणी येत आहेत. हे साहित्य तयार करणारे लहानसहान कारखाने सध्या बंद असल्याने त्यांचे उत्पादन थांबले आहे. त्यामुळे त्यांचा पुरवठा योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळेही निर्यातीत अडचण येत आहे. नेहमी होणाऱ्या एकूण फळांच्या निर्यातीपेक्षा आता ६० ते ६५ टक्के निर्यात सुरू आहे. त्यातही अडचणी वाढल्या तर व्यापारी आणि पर्यायाने शेतकऱ्यांचेही नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पॅकेजिंगचे साहित्य महाग
या सर्वांच्या वाहतुकीच्या भाड्यामध्ये सरासरी १० ते २० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे निर्यातदारांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे. तर, निर्यात करण्यासाठी लागणारे पॅकेजिंगचे साहित्य उपलब्ध होत नसल्यानेही अडचणी वाढल्या आहेत. पॅकेजिंगसाठी लागणारे पुठ्ठे, कागदाच्या किमतीतही २० ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे तोही खर्च वाढला आहे. किमतीत वाढ होऊनही त्यांचा पुरवठा होत नसल्याने या अडचणींत भर पडल्याचे निर्यातदार मोहन डोंगरे यांनी सांगितले.