पुणे, दि. 25 : लोकसभा व विधानसभा निवडणूक २०२४ च्या वेळी सर्वांनी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात देशात राज्याचा गौरव होत आहे, ही आपल्यासाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, एम.आय.टी. विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात श्री.कुलकर्णी बोलत होते. यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त दिलीप गावडे, पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, एम.आय.टी. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदारांना शुभेच्छा देवून डॉ. कुलकर्णी म्हणाले, यावर्षीपासून राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यातील विविध भागात राज्यपातळीवरील कार्यक्रम आयेाजित करण्याचा निर्णय मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने घेतला आहे; त्याची सुरुवात पुणे येथून करण्यात आली आहे. समाजातील मतभेद चर्चेतून सोडविणे, लोकशाहीप्रती आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी मतदार दिवस साजरा करण्यात येतो. मतदान हे पवित्र कार्य असून मतदारांनी त्याचा व्यापक अर्थ समजून घेतला पाहिजे.
राज्यात एक लाखाहून अधिक मतदान केंद्र आहेत, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सर्व संबंधित शासकीय यंत्रणेचे सुमारे 16 लाख कर्मचारी काम करीत असतात. निवडणुकीच्या वेळी काम करणाऱ्या प्रत्येकांचा सहभाग महत्वपूर्ण आहे, प्रत्येक व्यक्ती सत्कारास पात्र आहे, प्रत्येकांपर्यंत निवडणूक आयोगाची भावना पोहोचली पाहिजे, यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान करण्यात येतो, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.
मतदारांमधील उदासिनता कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे- डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, लोकशाही सशक्त करण्यामध्ये निवडणुकीची भूमिका महत्वपूर्ण आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, अचूक पद्धतीने पार पाडण्यासाठी गाव पातळीपासून ते भारत निवडणूक आयोगापर्यंत सर्वच अहोरात्र काम करीत असतात. यामध्ये मतदार यादी आणि मतदार हा निवडणुकीचा आत्मा आहे. त्यामुळे शहरी भागात तसेच नवमतदारांमधील उदासिनता कमी करण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्याविद्यालयांनी पुढे येवून प्रयत्न करणे गरजेचे आहे. शैक्षणिक संस्थांनी शिक्षणासोबतच मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी चर्चासत्रे, कार्यशाळांसारखे कार्यक्रमाचे आयोजन करण्याची आवश्यकता आहे, याकरीता स्वत:मध्ये बदल केला पाहिजे, नवीन पिढीला त्याबाबत जाणीव झाली पाहिजे, असे आवाहन डॉ. पुलकुंडवार यांनी केले.
निवडणूक यंत्रणेचे कार्य नागरिकांपर्यंत पोहोचवावे कार्य करावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
प्रास्ताविकात श्री. डुडी म्हणाले, मतदार जनजागृती करुन मतदार नोंदणीचे कार्य, निवडणूक यंत्रणेचे कार्य गावोगावी पोहोचविणे हा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. भारतीय लोकशाहीत निवडणूक प्रक्रिया आणि मतदानाचे महत्त्व लक्षात घेता मतदार जनजागृती व पात्र मतदारांची मतदारयादीत नाव नोंदणी मोहीम वर्षभर राबविण्यात यावी. निवडणूक यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांपर्यत पोहोचून ही कामे करीत असतात. गतवर्षी पार पडलेल्या निवडणुकीच्यावेळी सर्वांचा सहभाग घेवून पात्र मतदार नोंदणीचे काम चांगल्याप्रकारे झाले.
निवडणूक यंत्रणेने विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आदींमार्फत निवडणूक यंत्रणेचे कार्य कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचे काम करावे. 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवून घ्यावे. आपले एक मत बहुमूल्य असून मतदान करतांना कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनास बळी पडू नका, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे श्री. डुडी म्हणाले.
डॉ. चिटणीस म्हणाले, निवडणुकीच्या काळात प्रशासनासोबत ‘मतदार राजा जागा हो’ कार्यक्रमाचे आयोजन करुन विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात आली. निवडणूक यंत्रणेकडून करण्यात येणाऱ्या कार्यात एम.आय.टी. विद्यापीठाला सहभागी करुन घ्यावे.
यावेळी लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, टपाली मतपत्रिकांची देवाण-घेवाण करण्याचे नियोजन, मतदान साहित्य वाटप करून घेण्याचे नियोजन, मतदार सुविधा, वार्तांकन पुरस्कार आणि शासकीय भागीदारी यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४: उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार २०२५ : नंदूरबारच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री, लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अकोला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार, गडचिरोली जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, हातकणंगलेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि मुंबई उत्तर पूर्वचे अतिरिक्त जिल्हाधिकारी उपेंद्र तामोरे
विधानसभा निवडणुकीच्यावेळी टपाली मतपत्रिकांची देवाण- घेवाण उत्कृष्ट नियोजन : छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४: उत्कृष्ट मतदार सुविधा पुरस्कार २०२५: अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था ) संजय सक्सेना, बृहन्मुंबई शहरचे सह आयुक्त ( कायदा व सुव्यवस्था) श्री. सत्यनारायण.
लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४: उत्कृष्ट निवडणूक वार्तांकन पुरस्कार २०२५: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे तत्कालिन संचालक राहुल तिडके, प्रभारी संचालक तथा उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे.
यावेळी मतदार जागृती दालन, सेल्फी पॉईंट, मतदार जागृती खेळ आणि पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार ओळखपत्राचे वाटप कार्यक्रमाबरोबरच मतदारांना शपथ देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या संदेशाची चित्रफित दाखविण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणी सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, ऑलिम्पिक महिला नेमबाज तथा निवडणूक सदिच्छादूत राही सरनोबत, भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव, एव्हरेस्टवीर उमेश झिरपे, अंतराळ उद्योजक श्वेता कुलकर्णी, तृतीयपंथी कार्यकर्ता तथा निवडणूक सदिच्छादूत गौरी सावंत, तृतीयपंथी छायाचित्र पत्रकार झोया लोबो, अमुक-तमूक यूट्यब चॅनेलचे ओंकार जाधव व सावनी वझे आणि खास रे टी.व्हीचे संजय कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
0000